लॅब्सना सरकारचेच अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 05:05 AM2016-07-25T05:05:26+5:302016-07-25T05:05:26+5:30

बोगस पॅथॉलॉजी लॅबवर ‘बोगस डॉक्टर’ कायद्यान्वये कारवाईबाबत राज्य सरकारने घुमजाव केले. हे करताना ग्रामीण भागात पॅथॉलॉजिस्टची कमतरता असल्याने

The government of Labs is Abhay | लॅब्सना सरकारचेच अभय

लॅब्सना सरकारचेच अभय

Next

पूजा दामले,  मुंबई
बोगस पॅथॉलॉजी लॅबवर ‘बोगस डॉक्टर’ कायद्यान्वये कारवाईबाबत राज्य सरकारने घुमजाव केले. हे करताना ग्रामीण भागात पॅथॉलॉजिस्टची कमतरता असल्याने या लॅबना सूट दिल्याचे तोकडे स्पष्टीकरण सरकारने दिले. मात्र कारवाईचा उगारलेला बडगा मागे घेताना सत्यता पडताळण्याची साधी तसदीही सरकारी यंत्रणांनी घेतलेली दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यात सुमारे अडीच हजार अधिकृत पॅथॉलॉजिस्ट कार्यरत आहेत. असे असूनही बोगस पॅथॉलॉजिस्टना सूट का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात सध्या ३६ जिल्ह्यांत पॅथॉलॉजिस्ट कार्यरत आहेत. त्याचबरोबर तालुका पातळीवरही तब्बल ३०० पॅथॉलॉजिस्टचे जाळे पसरलेले आहे. राज्यात सुमारे अडीच हजार नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आहेत. राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबची संख्या मात्र पाच हजारांवर गेलेली आहे. यातून निदानाच्या या काळा बाजाराचे स्वरुप किती भीषण आहे, याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे राज्याच्या दुर्गम भागातही पॅथॉलॉजिस्ट कार्यरत आहेत. गडचिरोलीत जिल्हा रुग्णालयात एक आणि खासगी प्रॅक्टिस करणारा एक असे दोन एमडी पॅथॉलॉजिस्ट आहेत. गोंदिया, चंद्रपूर येथेही १० ते १२ एमडी पॅथॉलॉजिस्ट आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पॅथॉलॉजिस्ट नाहीत, असा निष्कर्ष सरकारने काढला तरी कसा? असा सवाल महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
जिल्हा आणि तालुका पातळीवर बोगस पॅथॉलॉजी लॅबमुळे एमडी पॅथॉलॉजिस्टना काम करणे कठीण बनत आहे. यामुळेच राज्यभरात ३० हून अधिक एमडी पॅथॉलॉजिस्ट तालुका ठिकाणचे काम सोडून पुन्हा शहरात पॅ्रक्टिससाठी आले असल्याचे प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्टने म्हटले आहे. आजाराचे निदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबमधून आलेल्या अहवालाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त, मूत्र, बॉडी फ्युएडच्या तपासण्या केल्या जातात. त्यामुळे या लॅबमध्ये प्रशिक्षित डॉक्टर असणे गरजेचे आहे. राज्यात मात्र बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. वैद्यकीय ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीही खुलेआमपणे स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.
जिल्हा आणि तालुका पातळीवर जेथे एमडी पॅथॉलॉजिस्ट कार्यरत आहेत तिथल्या बोगस पॅथॉलॉजी लॅबवर सरकारी यंत्रणा का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न पॅथॉलॉजिस्टनी उपस्थित केला आहे. ज्या ठिकाणी पॅथॉलॉजिस्ट नाहीत, तेथे अशिक्षित व्यक्तींना पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यास परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे जिथे पॅथॉलॉजिस्ट नाहीत, तिथे आरोग्य केंद्रात अथवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतात. त्यांना प्राथमिक तपासण्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तपासण्या करुन घेणे शक्य आहे. दुसरा पर्याय म्हणजे खूप महत्त्वाच्या तपासण्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पॅथॉलॉजी लॅबमध्ये सॅम्पल्स पाठवता येऊ शकतात. या पर्यायांचा शासनाकडून विचार होणे गरजेचे असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

Web Title: The government of Labs is Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.