नागपूरच्या संस्थेस शासकीय जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2015 01:55 AM2015-06-10T01:55:25+5:302015-06-10T01:55:25+5:30
केंद्रीय विद्युत व संशोधन संस्थेस (सीपीआरआय) नागपूर तालुक्यातील धुटी येथील ४९.०४ हेक्टर जमीन नाममात्र एक रुपया दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : केंद्रीय विद्युत व संशोधन संस्थेस (सीपीआरआय) नागपूर तालुक्यातील धुटी येथील ४९.०४ हेक्टर जमीन नाममात्र एक रुपया दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संस्थेचे कोराडी येथील थर्मल संशोधन केंद्र स्थलांतरित करण्यासाठी तसेच विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परीक्षण प्रयोगशाळा स्थापण्यासाठी ही जमीन देण्यात आली आहे. या संस्थेतील प्रयोगशाळेमुळे राज्यातील सर्व विद्युत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांतील विद्युत संचाचे परीक्षण व प्रशिक्षण राज्यामध्येच करणे शक्य होणार आहे.
केंद्रीय विद्युत संशोधन संस्था ही स्वायत्त संस्था आहे. तिचे मुख्यालय बंगळुरू येथे असून भोपाळ,
हैदराबाद, कोराडी, नोएडा, कोलकाता, गुवाहाटी येथे शाखा आहेत. (विशेष प्रतिनिधी)