शाही मेजवानीत सरकारी उजेड

By admin | Published: December 14, 2014 12:47 AM2014-12-14T00:47:18+5:302014-12-14T00:47:18+5:30

मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी नुकतीच शाही मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीत विद्युत

Government lighting in the royal feast | शाही मेजवानीत सरकारी उजेड

शाही मेजवानीत सरकारी उजेड

Next

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची उपस्थिती : हिलटॉपवर रंगला सोहळा
नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी नुकतीच शाही मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीत विद्युत झगमगाटासाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. एकीकडे वीज बिल भरले नाही तर शेतकऱ्यांची वीज कापणारे महावितरणचे अधिकारी या प्रकरणात मात्र गप्प आहेत. वीजचोरी करणाऱ्या कंत्राटदारावर थातूरमातूर कारवाई करीत २१ हजाराचा दंड आकारून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मेजवानीसाठी वीजचोरी केली जात असल्याचे उघडकीस आले असून सध्या हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे. नागपूरच्या गुलाबी थंडीत अपक्ष नगरसेवक व मुख्यमंत्र्यांचे खासमखास परिणय फुके यांनी बुधवारी रात्री हिलटॉप परिसरातील एका शाळेच्या परिसरात सरकारच्या मंत्र्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले होते.
या मेजवानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ मंत्री, पदाधिकारी, सचिवस्तरीय अधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी ही शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईसाठी चक्क वीज वितरण कंपनीच्या खांबावरून वीज घेण्यात आली होती. वीज प्रवाहित करणाऱ्या तारांवर वायर (आकडे) टाकून विजेची खुलेआम चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार अनेकांच्या नजरेस येत होता.
धक्कादायक म्हणजे ज्या वीज वितरण कंपनीच्या विजेची चोरी केली जात होती त्याच वीज वितरण कंपनीचे अनेक अधिकारी या मेजवानीला आले होते. नागपुरचे महापौरसुद्धा रात्री येथे आले.
यापैकी कुणाच्याही ही वीजचोरी लक्षात आली नाही. शहरात एखाद्याने वीजचोरी केल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी दंडात्मक कारवाई करतात. घरची वीज कापतात. मात्र मंत्र्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या खाजगी कार्यक्रमात उघडपणे वीजचोरी करूनसुद्धा वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित असतानाही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, आक्षेप नोंदविला नाही.
डेकोरेशनवाल्याकडून २१ हजाराची दंडात्मक वसुली
एका खाजगी कार्यक्रमात वीजचोरी होत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. आम्ही कार्यक्रम स्थळाला भेट दिली. आयोजकांकडे विचारणा केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यास डेकोरेशनवाल्याला कंत्राट दिले होते. आयोजकांकडून डेकोरेशनवाल्यांचा नंबर घेऊन विचारणा केली. वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी दंड भरण्यास तयार असेल तर त्यावर गुन्हा नोंदवीत नाही. डेकोरेशनचा मालक दंड भरण्यास तयार झाला. त्यानुसार त्याच्याकडून वीज चोरीप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
- राजेश नाईक,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण
लाखोचा खर्च केला,
दोन हजाराची वीज कशाला चोरणार?
या संपूर्ण कार्यक्रमाचे कंत्राट एका डेकोरेशन कंत्राटदाराला दिले होते. माझ्या शाळेत १०० केव्हीचे जनरेटर आहे. या जनरेटरच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी वीजपुरवठा होत होता. पार्किंगच्या जागेवर कॉन्ट्रॅक्टरने वीजचोरी केली असेल, मात्र ही बाब त्याने माझ्या लक्षात आणून दिली नाही. वीजचोरीची बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी स्वत: कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात तक्रार केली आहे. मी कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले, मग दोन-चार हजाराची वीज कशाला चोरी करणार?
- परिणय फुके, नगरसेवक

Web Title: Government lighting in the royal feast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.