महाराष्ट्र सरकार अॅक्टिव्ह झाले; कर्नाटक पोलिसांची अटींवर साहित्य संमेलनास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 07:52 PM2020-01-11T19:52:21+5:302020-01-11T19:53:00+5:30
महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बेळगावातील प्रशासन अधिकाऱ्यावर दूरध्वनीवर चर्चा करून परवानगी द्या, अशी मागणी केली होती.
बेळगाव : महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कर्नाटकाचे प्रशासन नरमले असून सीमा भागात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत बेळगाव पोलिसांनी मवाळ भूमिका घेतली आहे. यामुळे साहित्य संमेलनाला परवानगी दिली आहे. एकीकडे परवानगी दिली असली तरी संमेलन आयोजकांना कोणतेही भडकाऊ भाषण करू नये, अशा अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बेळगावातील प्रशासन अधिकाऱ्यावर दूरध्वनीवर चर्चा करून परवानगी द्या, अशी मागणी केली होती. महाराष्ट्रातील नेते बेळगावच्या बाबतीत सक्रिय झाल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा दिसले आहे. कुद्रेमानी आणि ईदलहोंड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला परवानगी दिली असली तरी पोलिसांनी काही जाचक अटी लादल्या आहेत.
दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करू नये. कोणतेही भडकाऊ भाषण करू नये, अशा अटी घालून परवानगी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता मराठी साहित्य संमेलने ही भाषा संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आयोजित केली जातात. बेळगाव सीमा भागामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरवर्षी दर रविवारी या साहित्य संमेलनाचे आयोजन होत असते. कोणताही शासकीय निधी नसताना निव्वळ लोक वर्गणीतून सीमाभागात मराठी साहित्य संमेलनाचा गजर केला जातो. कर्नाटक पोलिसांनी दडपशाही करून परवानगी नाकारत मराठी माणसाच्या सामान्य मराठी माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सीमाभागातील मराठी जनतेने याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. याची दखल महाराष्ट्राच्या नेत्यांनी घेत कर्नाटकाच्या प्रशासनावर दबाव वाढवला. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत शेवटच्या क्षणी परवानगी दिली आहे.
साहित्य संमेलनास लोक कमी जमावेत या उद्देशाने परवानगी देण्यास टाळाटाळ सुरू होती. आयोजकांच्या वरही दडपशाही केली जात होती. आता मात्र हजारोच्या संख्येने मराठी भाषिक साहित्य संमेलनास उपस्थिती लावतील आणि हे संमेलन यशस्वी करून दाखवतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.