सरकार नागपुरात

By admin | Published: December 7, 2014 12:31 AM2014-12-07T00:31:48+5:302014-12-07T00:31:48+5:30

सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच रविवारी नागपुरात दाखल होणार आहे. अधिवेशनाची संपूर्ण तयारी विधिमंडळ सचिवालय आणि स्थानिक

Government in Nagpur | सरकार नागपुरात

सरकार नागपुरात

Next

सभापती, अध्यक्ष आज येणार : १९ पर्यंतचे कामकाज ठरले
नागपूर : सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच रविवारी नागपुरात दाखल होणार आहे. अधिवेशनाची संपूर्ण तयारी विधिमंडळ सचिवालय आणि स्थानिक प्रशासनाने पूर्ण केली आहे. काही मंत्री नागपुरात दाखल झाले असून रविवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती वसंत डावखरे यांचे नागपुरात आगमन होणार आहे. शिवाजीराव देशमुख आणि हरिभाऊ बागडे स. ९.२५ वा. तर उपसभापती वसंत डावखरे हे सायं. ५ वा. येणार आहेत. बहुतांश मंत्रीही रविवारी दुपारपर्यंत दाखल होणार आहेत.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनाचा अपवाद वगळता नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सचिवालाचे कामकाज यापूर्वीच सुरु झाले असून रविवारी मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य नागपुरात दाखल होत आहे. काही मंत्र्यांचे शनिवारीच आगमन झाले आहे. आमदारांसाठी आमदार निवास सज्ज ठेवण्यात आले असून मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून विधिमंडळ सदस्य आणि मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी दाखल होतील. अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच नागपुरात दाखल होणार आहे. सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसल्याने यंदा दोन सत्ताकेंद्र नसतील. सुरुवातीच्या दोन आठवड्याच्या म्हणजे १९ तारखेपर्यंतच्या कामकाजाला विधिमंडळ सल्लागार समितीने मंजुरी दिली आहे. १८ तारखेला या समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर अधिवेशनाचा पुढचा कार्यकाळ ठरेल. या अधिवेशनात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक आणि सहकारी संस्था सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहेत, असे विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.
दुष्काळाचा मुद्दा गाजणार
विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ आणि या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गाजत आहेत. यासंदर्भात अनेक सदस्य विविध सांसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सभागृहात करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नागपूर विभागात २०२९ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असून मोठ्याप्रमाणात नापिकी झाली आहे. नियमित वीज पुरवठा होत नसल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
काँग्रेसचा ‘हल्लाबोल’मोर्चा
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज आणि दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ८ तारखेला प्रदेश काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स. ११ वा. दीक्षाभूमीवरून हा मोर्चा निघणार आहे.आज नागपूर येथे यासंदर्भात बैठक झाली. त्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार, ,माजी मंत्री राजेंद्र मुळक,काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकर, प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी याच्यासह इतरही नेते उपस्थित होते.

Web Title: Government in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.