दुष्काळी परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, शरद पवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:51 AM2019-05-05T06:51:36+5:302019-05-05T06:51:55+5:30
राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे.
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. पण दुष्काळाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा पक्षाने घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. दुष्काळी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडले. दुष्काळाबाबत दौरे करण्यास व निर्णय घेण्यास सरकारला उशीर झाला आहे. सरकारने फळबागा वाचविण्यासाठी अतिरिक्त मदत द्यावी. पशुधन वाचविण्यासाठी निधी वाढवावा. शेतकऱ्यांकडून होत असलेली सर्व प्रकारची वसुली त्वरित थांबवावी. कर्जमाफी व कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुष्काळ निवारणाचे काम करताना निवडणूक आयोगाचा अडथळा होत नाही, असा आपला अनुभव असल्याचे पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
राज्यातील भीषण दुष्काळाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या शिष्टमंडळात होते.
राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाही
राज ठाकरे यांची पाठराखण करताना पवार म्हणाले की, राज यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्याकडून सभांचा खर्च मागणे चुकीचे आहे. या काळात आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, तो लोकशाहीने दिलेला आहे. १९७७ मध्ये आणीबाणीविरोधात पु. ल. देशपांडे व इतरांनी प्रचार केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणीही प्रचाराचा खर्च मागितला नव्हता, याचे स्मरण पवारांनी आयोगाला करून दिले.
मोदी काहीही बोलतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज आहे. निकालानंतर देशात नवीन सरकार अस्तित्वात येईल. राष्ट्रपतींनी संधी दिल्यावर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हानात्मक काम केवळ आम्हीच करू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षणमंत्री म्हणून मी काम केले आहे. आम्ही संरक्षण खात्याच्या कामगिरीचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही. दलाच्या कामगिरीचा गैरवापर निवडणुकीसाठी केला जाणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती असा गैरवापर करत आहे, हे अधिक दुर्दैवी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कान टोचले.