शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक यंत्र बंद
By admin | Published: May 10, 2014 10:41 PM2014-05-10T22:41:18+5:302014-05-10T23:50:16+5:30
कामचुकार कर्मचार्यांवर लगाम लावण्यात कुचकामी
बुलडाणा : शासकीय कामकाजात कसलीही दिरंगाई होऊ नये, प्रामाणिकतेने सर्व कर्मचार्यांनी कार्यालयात काम करावे या उद्देशाने शासनाने बायोमेट्रिक पद्धत अंमलात आणली. मात्र ही पद्धत बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील कामचुकार कर्मचार्यांवर लगाम लावण्यात कुचकामी ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात लावण्यात आलेले बॉयोमेट्रिक यंत्र नादुरुस्त पडून आहेत. काही यंत्रांमध्ये तर जाणून बिघाड आणण्यात आला आहे. एकंदरित शासकीय कर्मचार्यांकडून बायोमेट्रीक पद्धतीला ठेंगाच असल्याचा प्रकार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पाहावयास मिळत आहे. असे असतानाही शासनाची दिशाभूल केली जात आहे. शासनाच्या सर्व योजना व शासकीय कामकाजाकरिता अनेक स्वतंत्र विभागासह शासकीय संस्था, निमाशासकीय संस्थांचे कार्यालय आहेत. जिल्ह्याची ठिकाण असलेल्या बुलडाणा शहरात जवळपास ३0 पेक्षा जास्त कार्यालये असून हजारावर कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कर्मचार्यांच्या अनियमितेमुळे शासकीय कार्यालयांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा प्रत्यय येत आहे. कार्यालयात कार्यरत कर्मचारी कार्यालयीन वेळेत दिसत नाहीत. अनेकदा अनेक कर्मचारी बाहेर गावावरुन ये-जा करून कार्यालयीन कर्तव्य बजावीत असतात. कार्यालयाची वेळसुद्धा त्यांना ठाऊक नसते. दुपारी १२ पयर्ंत कार्यालयात पोहोचणे आणि दुपारी ३ वाजता निघून जाणे, असे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयीन कामकाजासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शासकीय कामकाजात दिरंगाई होत असते.यासाठी शासनाने बॉयोमेट्रिक पद्धत सुरू केली. एकंदरीत कामचुकार कर्मचार्यांवर लगाम खेचण्यात शासनच सपेशल अपयशी ठरले आहे. शासनाच्या या दुर्लक्षतेमुळे बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना सर्वात जास्त फटका बसत आहे. विशेषत: बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध ठिकाणाहून अप-डाऊन करुन कर्तव्य बजावीत आहेत. या प्रकारामुळे शासकीय व प्रशासकीय कामात मोठा परिणाम होतांना दिसत आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रीय करावे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यात सर्वचस्तरावरुन उमटू लागली आहे.