आता सरकारी कार्यालयात सिगारेटचा झुरका, तंबाखूची गोळी पडेल २०० रुपयांना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 06:15 AM2023-07-11T06:15:05+5:302023-07-11T06:15:26+5:30
राज्यभरातील सरकारी कार्यालये आणि कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
मुंबई : सरकारी कार्यालयांच्या परिसरात फिरता फिरता सिगारेटचा झुरका घेणे किंवा सहज तंबाखूची गोळी तोंडात ठेवणे भारी पडू शकते. आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना कार्यालयांच्या आवारात सापडल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
राज्यभरातील सरकारी कार्यालये आणि कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. बजावण्यात येणारा दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यासाठी अधिकारीही नियुक्त केले जाणार असून दंडाच्या पावतीपुस्तकाचा नमुनाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी जारी केला आहे.
या असतील उपाययोजना
सरकारी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेट जमा करण्यासाठी पेटी ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक मजल्यावर, लिफ्ट आदी ठिकाणी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या हानीबाबतचे फलक लावले जाणार आहेत.
या फलकावरच सिगारेट अथवा तंबाखूविरोधी मोहिमेच्या अधिकाऱ्यांचे नाव, नंबर दिले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून सरकारी इमारतीमध्ये व आवारात सिगारेट अथवा तंबाखूजन्य उत्पादने वापरल्यास दोनशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी खासगी कार्यालये, उपहारगृहे, शाळा-महाविद्यालयांनी त्यांच्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी, असेही या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.