शासकीय कार्यालये होईनात ‘कॅशलेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 02:11 AM2017-01-19T02:11:09+5:302017-01-19T02:11:09+5:30
कॅशलेस व्यवहारांवर नागरिकांनी भर देण्याचे आवाहन केले जाते, बक्षिसे दिली जातात.
पिंपरी : कॅशलेस व्यवहारांवर नागरिकांनी भर देण्याचे आवाहन केले जाते, बक्षिसे दिली जातात. दुसऱ्या बाजुला मात्र शहरातील अनेक शासकीय कार्यालयांत स्वाइप मशिन उपलब्ध नसल्याने कॅशलेस व्यवहार कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांकडे एटीएम, डेबिट कार्ड उपलब्ध असताना संबंधित कार्यालयात यंत्रणाच उपलब्ध नसल्याने नागरिकांपुढेही रोखीने व्यवहार करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.
केंद्र शासनाने पाचशे, हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेण्यात आला. त्यानंतर सर्व व्यवहार कॅशलेस व्हावेत, यासाठी सरकार आवाहन करीत आहे. मात्र, अद्यापही पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय कार्यालयांसह महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वाइप मशिन उपलब्ध नसल्याने रोखीनेच व्यवहार सुरू आहेत. नागरिकांकडे एटीएम, डेबिट कार्ड असतानाही त्यांचा उपयोग होत नाही. यामुळे नागरिकांना अडचणींचा व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रोख रकमेसाठी रांगा कायम...
पाचशे, हजारच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर एटीएमवर रांगा लागत आहेत. त्या अद्यापही कमी झालेल्या नाहीत. बँक व एटीएममधून रोख रक्कम मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी अनेकांकडून एटीएम, डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र, एखाद्या कार्यालयात स्वाइप मशिनच उपलब्ध नसल्यास संबंधित व्यक्तीला गैरसोयीचा सामना करावा लागतो.
>परिवहन कार्यालय
अशाच प्रकारची स्थिती चिखलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहायला मिळाली. या ठिकाणी विविध कर भरण्यासाठी स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रकमेचा भरणा होत असतो. मात्र, तेथेही स्वाइप मशिनअभावी रोख रक्कमच द्यावी लागते. अशावेळी एखादा व्यक्ती रक्कम जमा करण्यासाठी कार्ड घेऊन आला, तरी त्याचा उपयोग होत नाही. मशिनच उपलब्ध नसल्याने रोख रक्कमच जमा करावी लागते.
>वायसीएम रुग्णालयात रुग्णांची गैरसोय
महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बिल भरण्यासाठी स्वाइप मशिन उपलब्ध नाहीत. त्यामुळे कार्ड स्वीकारण्यास नकार दिल्यास रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडते. यामुळे या ठिकाणी स्वाइप मशिन उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. या रुग्णालयात शहरासह आजूबाजूच्या तालुक्यातीलही रुग्ण दाखल होत असतात. एटीएम मशिनद्वारे पुरेशी रक्कम उपलब्ध न झाल्यास बिल भरताना एटीएम व डेबीट कार्डद्वारे पैसे जमा करून घेण्याबाबत विचारणा केली असता संबंधित प्रशासनाकडून नकार दिला जातो.
>कार्ड असूनही नसल्यासारखे
पाचशे, हजारच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर रोख रकमेची कमतरता भासू लागली. यामुळे नागरिकांनीदेखील कॅशलेस व्यवहारावर भर दिला. एटीएम, डेबिट कार्डचा वापर करीत व्यवहार सुरू ठेवले. मात्र, एखाद्या ठिकाणी कार्डच स्वीकारले जात नसल्याने नागरिकांची तारांबळ होत असून, रोखीनेच व्यवहार करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे खिशात एटीएम, डेबिट कार्ड असूनही उपयोेग नाही अशी स्थिती आहे.