ठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने होणार पुनर्विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 05:25 PM2021-06-15T17:25:31+5:302021-06-15T17:27:00+5:30
ठाणे स्टेशन रोड परिसरात सुमारे १०० वर्षे जुन्या इमारतींमध्ये विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करून त्यांना एकाच छताखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे.
मुंबई:ठाणे स्टेशन रोड परिसरात सुमारे १०० वर्षे जुन्या इमारतींमध्ये विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करून त्यांना एकाच छताखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकार घेत असून, त्याचे सविस्तर सादरीकरण मंगळवारी मंत्रालयात झाले. ठाणे महापालिकेकडे या प्रकल्पासाठी एक महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ठाणे स्टेशन रोड परिसरात तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, जुनी ठाणे महानगरपालिका इमारत, जिल्हा परिषदेची कन्याशाळा, अशा काही इमारती उभ्या आहेत. मात्र सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या या इमारती आता अत्यंत जीर्ण झाल्याने त्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे असल्याने पालकमंत्री शिंदे गेली काही वर्षे या इमारतींच्या जागी अत्याधुनिक पद्धतीची सरकारी कार्यालये व्हावीत यासाठी प्रयत्नशील आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्याने आता तो वेगाने पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी बैठकीत सांगितले. तसेच, वेगाने हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले.
या भागातील कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास होणार असून सर्व कार्यालयाना एकाच इमारतीत सामावून घेतले जाणार आहे. या जागी बहुमजली आयकॉनिक इमारत उभी राहणार असून या इमारतीत सद्यस्थितीत वापरत असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा या कार्यालयांना मिळणार आहे. याशिवाय सर्वसामान्य लोकांना आणि इमारतीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खासगी कार्यालयांना मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय या इमारतीच्या बाजूलाच शाळेसाठी स्वतंत्र इमारत आणि मैदान बांधून देण्यात येणार आहे. तसेच, काही छोटी खासगी कार्यालये आणि पालिका बाजार सुरू करण्यासाठी काही गाळे उपलब्ध होणार आहेत.
मंगळवारी झालेल्या या बैठकीला शिंदे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.