'सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस'; MHADAच्या परीक्षेवरुन गोपीचंद पडळकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 11:37 AM2021-12-12T11:37:42+5:302021-12-12T11:40:49+5:30
MHADA Exam: म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली.
मुंबई: आज(रविवारी) म्हाडाची परीक्षा(MHADA Exam) होणार होती, पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. राज्याचे गृहनिर्मण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करुन परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षार्थ्यांकडू नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस असल्याची टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे
'जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे ते स्व:चा गेल्या आठवड्यापासून सांगत आहेत. परीक्षेत घोटाळा झाल्याची त्यांना पूर्वकल्पना होती, गृहखाते देखील राष्ट्रवादीकडे आहे, मग असे असतानाही परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी परीक्षा रद्द करण्याची त्यांच्यावर वेळ आली. महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे, त्यांना पोरांच्या भविष्याची काळजी नाही', अशी टीका पडळकरांनी केली.
खर्चाची भरपाई कोण करणार ?
'आव्हाडांनी अचानक परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. पण, आज लाखो विद्यार्थी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटर लांब असणाऱ्या परीक्षा ठिकाणी पोहोचले. हजारो विद्यार्थी एसटी स्टॅन्ड वर, रेल्वे स्टेशन वर झोपले. काहीजणांनी खाजगी वाहतूकीचा वापर करुन परिक्षेसाठी पोहोचले, त्यांचे जादाचे पैसे देखील खर्च झाले याची भरपाई कोण देणार ? अनेकवेळा पेपर फुटत आहेत, आम्ही मागणी केली ही परीक्षा घेण्याचे आदेश एमपीएससीला द्या. पण पैसे मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक ब्लॅक लिस्ट असलेल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या वाटतं, असा टोला भाजप आमदार राम सातपुते यांनी लगावला.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
"काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती आहे.