वीजबिलमाफीच्या वादावरून सरकार-विरोधकांमध्ये जुंपली; राज ठाकरेंची भूमिका आज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 05:01 AM2020-11-19T05:01:56+5:302020-11-19T06:01:22+5:30

Mahavitaran: महावितरणची आजवरची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात जाण्यास आधीचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला.

government-opposition clashed over the electricity bill waiver dispute | वीजबिलमाफीच्या वादावरून सरकार-विरोधकांमध्ये जुंपली; राज ठाकरेंची भूमिका आज

वीजबिलमाफीच्या वादावरून सरकार-विरोधकांमध्ये जुंपली; राज ठाकरेंची भूमिका आज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. महावितरणची आजवरची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात जाण्यास आधीचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला.  ‘आधी घोषणा करता मग घूमजाव करत तोंड लपवता, ताकद असेल तर वीज बिल माफ करून दाखवा, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षेनते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राऊत यांनी असा आरोप केला की, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. तर राऊत चुकीची माहिती देत आहेत. आता पैसा नसल्याचे कारण देत बिल माफी देणार नाही, असे सांगत असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. 

महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सर्वसाधारण कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजपच्या काळात महावितरणची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात गेली. - नितीन राऊत, ऊर्जामंत्री

एसटीला मदत देता, मग...
ऊर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. वीज बिलाबाबत लोकभावना तीव्र आहेत, लोक भेटून आम्हाला निवेदने देत आहेत. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत केली. त्याप्रमाणे गरज पडल्यास वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसाव्या लागणाऱ्या लोकांनाही मदत झाली पाहिजे. -विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री

शिवसेनेकडून पलटवार
वाढीव वीज बिलाबाबत नितीन राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, पण भाजप या मुद्द्यावरून लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. भाजपच्या काळात थकबाकी वाढल्याने महावितरणला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. - सुनील प्रभू, आमदार, शिवसेना

सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. आधी वीज बिल माफीची घोषणा केली. आम्ही निर्णय घेतला आहे, असेही बोलले. पाच वर्षांचे मिळून येणार नाहीत, अशी बिले तीन महिन्यांत लोकांना आली, तरीही ती दुरुस्त केली गेली नाहीत. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

वीज बिल भरू नये. ग्राहकांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, 
नेते, वंचित बहुजन आघाडी

राज ठाकरेंची भूमिका आज
वाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. मनसेची या संदर्भात गुरुवारी मुंबईत बैठक होणार असून तीत या बाबतची भूमिका ठरेल.
 

Web Title: government-opposition clashed over the electricity bill waiver dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.