परीक्षा शुल्क माफीबाबत सरकार सकारात्मक
By Admin | Published: March 15, 2016 01:37 AM2016-03-15T01:37:36+5:302016-03-15T01:37:36+5:30
मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद
मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानपरिषदेत केले.
मागील चार वर्षांपासून मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाड्यात सर्व प्रकाराचे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकाराच्या फी माफ करण्यात याव्यात. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे, त्यांना फी परत करण्यात यावी, अशा आशयाची लक्षवेधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली. यावर तावडे म्हणाले, ‘मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.’ अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही तावडे यांनी सांगितले. दुष्काळाने सामान्य लोक होरपळून निघत असताना सरकार अद्यापही माहिती घेण्याचे काम करत असल्याचे उत्तर विनोद तावडे यांच्याकडून मिळालेल्या विरोधकांनी गोंधळ घातला. शिवाय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शुल्क माफ झालेच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)