कलंकित मंत्र्यांवरून सरकारने पळ काढला

By admin | Published: July 23, 2016 04:21 AM2016-07-23T04:21:30+5:302016-07-23T04:21:30+5:30

विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली.

The government ran away from the tarnished ministers | कलंकित मंत्र्यांवरून सरकारने पळ काढला

कलंकित मंत्र्यांवरून सरकारने पळ काढला

Next


मुंबई : विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली. शिवाय, कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर देण्याऐवजी सरकारने पळ काढल्याचा आरोप काँगे्रस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते
जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. तसेच ‘राईट टू रिप्लाय’ अंतर्गत विरोधकांना बोलू न देता तालिका सभापती योगेश सागर यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याच्या कृत्याचा निषेधही नोंदविला.
गुरूवारी झालेल्या चर्चेत २० मंत्र्यावर आम्ही पुराव्यासह आरोप केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय, असे तत्व अंगिकारले आहे. खडसे यांना सत्तेपासून, मत्रिमंडळापासून लांब ठेवण्यात त्यांचा काय हेतू आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. कारण, भोसरी जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.
मात्र, दुसरीकडे हेच मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना त्यांच्या विरोधात तपास सुरू असतांना, काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना त्यांचा बचाव करतात. यावरून त्यांची भूमिका संशयास्पद दिसते. मुखयमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाला राईट टू रिप्लाय अंतर्गत बोलण्यास संधी द्यायला हवी होती. मात्र, ती न देता व कार्यक्रम पत्रिकेनुसार विधेयकावर चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी मध्येच मंगलप्रभात यांच्या ठरावावर चर्चेचा आग्रह धरला. त्यांचे हे कृत्यही संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही. तसेच कलंकित मंत्र्यासंदर्भात त्यांनी सभागृहास दिशाभूल करणारी खोटी माहिती दिल्याने आम्ही त्याचा जाब विचारणार होतो. मात्र, त्यांनी तालिका सभापती योगेश सागर यांचा आधार घेऊन त्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब करून पळ काढल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
>तालिका सभापतींच्या भूमिकेवर संशय
सरकारच्या या संशयास्पद भूमिकेबाबत विधीमंडळातील पुढील रणनिती ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहातील काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आम्ही सोमवारी बैठक घेणार आहोत. त्यावेळी सर्व प्रमुख नेते आणि आमदारांची मते ऐकून पुढील दिशा ठरविली जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.सभागहातील काही तालिका सभापतींचा कारभार निश्चितच पारदर्शी आहे. मात्र, योगेश सागर यांच्या सारख्या काहींची भूमिका संशयास्पद आहे. ते नेहमी सरकारच्या दबावास बळी पडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही उभयंतानी यावेळी केला.

Web Title: The government ran away from the tarnished ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.