सरकारचा रीमोट माझ्याच हाती !
By admin | Published: January 24, 2016 02:46 AM2016-01-24T02:46:17+5:302016-01-24T02:46:17+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा रीमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आला. मात्र आज अनेक कामांच्या योजनांचा शुभारंभ करताना उद्धव यांनी रीमोट
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा रीमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आला. मात्र आज अनेक कामांच्या योजनांचा शुभारंभ करताना उद्धव यांनी रीमोट माझ्या हातात दिला. त्यामुळे युती सरकार चालवण्याचा रीमोट कंट्रोल माझ्या हातात आहे आणि सरकार चालविण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेला लगावला. काहीही झाले तरी महाराष्ट्रात कामाच्या जोरावर ‘शिवशाही’च पाच वर्षे कायम दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आठ योजनांची सुरुवात शनिवारी रीमोटद्वारे करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. या कार्यक्रमाला
परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते, आरोग्यमंत्री दीपक सावंत, खा. अनिल देसाई, अरविंद सावंत, एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनीअसून, शेवटपर्यंत वाट पाहणाऱ्या माणसालाही एसटीचा आधार वाटतो, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, २४ तास तुम्ही महाराष्ट्राला सेवा देता हे कोणी विसरू शकत नाही.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले की,बऱ्याच वर्षांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद पाहायला मिळत आहे. सरकार बदलले ही चुणूक तुमच्यामुळेच दिसून आली. एसटीचे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, त्याची कोणी दखल घेतली नाही. आधीच्या सरकारने तर अजिबात घेतली नाही. त्यामुळे आताच्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष दिले पाहिजे.
यावेळी त्यांनी शिवशाही बस सेवेचा उल्लेख करत बसवर फडकलेला भगवा गावोगावी पोहोचविण्याचे आवाहन केले. महामंडळाच्या योजना तर लोकाभिमुख आहेतच. पण प्रत्यक्षात कामच बोलत असल्याने आपल्याला अधिक बोलण्याची गरज लागत नाही, असे ते म्हणाले.
पै-पैचा वापर...
एसटी कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसाच्या वेतनाची एकूण ६ कोटी २६ लाख ३१ हजार ४८९ रुपये एवढी रक्कम दुष्काळनिधीसाठी देण्यात आली. तुम्ही दिलेली पै आणि पै शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली जाईल, असा विश्वास त्यांनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना दिला.
शिवशाहीवरून कोपरखळी...
शिवशाही बससेवेचा उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारी काम हे पूर्वी ठोकळ्यासारखे होते. आता तसे राहिले नाही. हे शिवशाही बसमधूनच दिसून आले. आपण शिवशाहीत प्रवेश करतोय हे बसमध्ये प्रवेश करताच समजते.’