'सरकार म्हणते बेटी बचाव, आमदार म्हणतात बेटी भगाव'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 11:32 PM2018-10-29T23:32:56+5:302018-10-29T23:33:21+5:30
कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला कार्यकर्ता मेळावा
कर्जत : गेल्या चार वर्षांमध्ये महागाई खूप वाढली आहे. यंदाची दिवाळी कशी करायची हा प्रश्न पडला आहे. पदव्या आहेत, मात्र मुलांना नोकऱ्या नाहीत. रेशनिंगची तऱ्हाच वेगळी आहे. मोदी म्हणतात, बेटी बचाव आणि त्यांचे आमदार म्हणतात बेटी भगाव, काय चाललेय हेच कळत नाही, अशी परखड टीका महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश महिलाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कोकण विभागातील संपर्क दौºयाच्या अनुषंगाने कर्जत व खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा येथील यशदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर कर्जत-खालापूर मतदार संघ आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हिरा दुबे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा दीपिका चिपळूणकर, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा कमल विशे, राजिप शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, राजिप महिला व बालकल्याण उमा मुंढे, कर्जत नगराध्यक्षा रजनी गायकवाड, खोपोली नगराध्यक्षा सुमन औसरमल आदी उपस्थित होत्या.
वाघ म्हणाल्या, आता उज्ज्वला गॅस निघालाय, महिलांच्या डोळ्यात धूर जाऊ नये म्हणून फुकट गॅस कनेक्शन दिले, पण सिलिंडरसाठी गरिबांनी पैसे कुठून आणायचे, हे सरकार सांगत नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहे, पुरु षांच्या बरोबरीने महिला काम करतात, मात्र त्या सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.
अदिती तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थिती महिलांना योग्य प्रकारे कळावी, त्यांना जाणीव व्हावी यासाठी महिला मेळाव्याची गरज आहे. शरद पवारांमुळे आपल्याला आरक्षणाने संधी मिळाली आहे. त्याचा समाजासाठी व महिलांच्या विकासासाठी काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपले बालेकिल्ले राखण्यासाठी आपण सतत सतर्क राहिले पाहिजे, असा सल्ला तटकरे यांनी दिला.
आमदार सुरेश लाड यांनी चित्रा वाघ यांचा महिलांना नेहमीच आधार वाटतो. ज्या ज्या वेळी महिलांवर अन्याय होत असतो, त्यावेळी सर्वात आधी पोहचून त्यांना न्याय मिळवून देत असल्याचे सांगितले.