खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

By Admin | Published: January 19, 2017 06:20 AM2017-01-19T06:20:43+5:302017-01-19T06:20:43+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र चांगले असल्याचे ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले

Government schools like govt schools from private schools | खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

googlenewsNext


मुंबई : खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज असला तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती ही खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली असल्याचे चित्र ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले आहे.
राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘प्रथम’ संस्थेने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा ‘असर’ अहवाल बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. २०१६मध्ये केलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील ३ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. ५ ते १६ वयोगटातील मुलांची वाचन आणि गणिताची चाचणी घेण्यात आली. त्यात खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तुलनेत चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेतील शाळांतील इयत्ता तिसरीच्या ४१.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरचा मजकूर वाचता आला. तर, खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरीच्या फक्त ३८.८ टक्के विद्यार्थ्यांनाच दुसरीचा मजकूर वाचता आल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा परिषदेतील शाळांतील इयत्ता पाचवीचे ५१.७ टक्के विद्यार्थी २०१४ मध्ये इयत्ता दुसरीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होते. हे प्रमाण २०१६मध्ये ११ टक्क्यांनी वाढून ६२.७ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील ५ वर्षांखालील ९५ टक्के बालके ही बालवाडी, अंगणवाडी व प्राथमिक शाळेत दाखल झाली आहेत. गेल्या १० वर्षांत खासगी शाळांमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांचे खासगी शाळांत प्रवेश घेण्याचे प्रमाण २००६ मध्ये १८.३ टक्के इतके होते. तर, २०१६ मध्ये हे प्रमाण ३८.३ टक्के इतके झाले आहे. पण, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांत चांगले मिळत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
राज्यात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या आणि अक्षरे व त्यापेक्षा अधिक वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ६०.७
टक्के आहे. तर देशात हे प्रमाण ५३.९ टक्के इतके आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणित सोडवण्याची क्षमता २०१४च्या तुलनेत वाढली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित (तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे) सोडवण्याचे प्रमाण २०१४मध्ये १८.९ टक्के होते. २०१६मध्ये हे प्रमाण २०.३ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यातील प्राथमिक शाळांची परिस्थिती चांगली असली तरी माध्यमिक शाळांची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील इयत्ता आठवीच्या २४.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचा मजकूर वाचता आलेला नाही. देशाच्या तुलनेत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची आणि शिक्षकांची उपस्थिती अधिक आहे. इयत्ता पहिले ते चौथी-पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती ८५.१ टक्के एवढी आहे. तर, देशातील शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण ७१.४ टक्के आहे. ज्या दिवशी सर्वेक्षण केले, त्या दिवशी पहिली ते चौथी-पाचवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ९१.८ टक्के होती. तर, देशातील अन्य शाळांतील उपस्थिती ही ८५.४ टक्के होती. (प्रतिनिधी)
>शाळांच्या सुविधेत वाढ
मुलींकरिता स्वतंत्र व स्वच्छ शौचालयाचे प्रमाण २०१०मध्ये 43.2%इतके होते. त्यात वाढ होऊन प्रमाण २०१६मध्ये 62.5% इतके झाले
>शाळा भेटीच्या दिवशी २०१० मध्ये 99.7% शाळेत माध्यान्ह भोजन दिले जात होते.
२०१६ मध्ये हे प्रमाण 94.5%इतके झाले आहे.

Web Title: Government schools like govt schools from private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.