सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:08 PM2022-09-06T13:08:17+5:302022-09-06T13:09:14+5:30

‘वर्षा’ येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

Government schools will be empowered, Chief Minister's guarantee on Teacher's Day | सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी

सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी

Next

मुंबई : राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘वर्षा’ येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सचिव रणजितसिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांबद्दल विश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवे प्रयोग विद्यार्थी करू लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागले आहे.

जालना जिल्ह्यातील श्रीरामतांडा येथील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांचे स्थलांतरण १०० टक्के रोखले. कोणत्याही सुट्टीविना शाळा ३६५ दिवस अविरत सुरू राहणारी चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा, तोरणमाळ येथील शाळा आजूबाजूच्या २९ पाड्यांवरील १,६०० मुलांसाठीची आदर्श निवासी शाळा झाली आहे, असे असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. 

आदर्श शाळा निर्माण करण्याचे खरे शिल्पकार शिक्षक असून, अशा शाळांची संख्या वाढविण्यासाठी निर्धार करूया. शिक्षकांची जागा कुणीही किंवा कोणतेही तंत्रज्ञान भरू शकत नाही, इतके महत्त्वाचे स्थान त्यांचे आहे, असे ते म्हणाले. 

शिक्षकांचे वेतन वेळेवरच होणार  
शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवरच जमा होईल. केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Government schools will be empowered, Chief Minister's guarantee on Teacher's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.