मराठा आरक्षणाबद्दल सरकार संवेदनशील
By Admin | Published: October 5, 2016 05:31 AM2016-10-05T05:31:48+5:302016-10-05T05:31:48+5:30
मराठा आरक्षणाबद्दल सरकार संवेदनशील आहे. आम्ही याबाबतीत ‘ओपन मायंडेड’ आहोत. मराठा आरक्षणाबद्दल मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
औरंगाबाद : मराठा आरक्षणाबद्दल सरकार संवेदनशील आहे. आम्ही याबाबतीत ‘ओपन मायंडेड’ आहोत. मराठा आरक्षणाबद्दल मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी नुकतीच एक सर्वपक्षीय बैठक झाली. मराठा समाजाच्या भावनांची आम्ही दखल घेतली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निर्णयांची घोषणा केली. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये चार मोठे उद्योजक यायला तयार असून ते मोठी गुंतवणूक करणार आहेत. त्यापैकी दोन उद्योजक आज औरंगाबादला आले होते. दोघे जण मुंबईत भेटतील. डीएमआयसीत साखळी हॉटेलमधील हयात हॉटेलही सुरूहोणार आहे. आता सुरुवात चांगली आहे, असे फडणवीस म्हणाले. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयाचा मुद्दा सध्या तरी सरकारच्या ऐरणीवर नाही. योग्यवेळी हे विभाजन होईल, असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. हे विभाजन लातूरला करायचे की नांदडेला यावरून आधीच मोठा संघर्ष आहे.
जालना येथे रेशीम कोषाची बाजारपेठ तयार करणार
कृषी उत्पादन आधारित ९ क्लस्टर उपलब्ध करणार. त्यातील चार क्लस्टरला मान्यता
परभणी, बीड, नांदेड येथे टेक्स्टाईल पार्कला मान्यता
नरेगाअंतर्गत समृद्धी उपक्रमांतर्गत २५ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार, ३६ हजार ५०० वैयक्तिक सिंचन विहिरी घेणार, हिंगोली जिल्ह्यात १० हजार विहिरी देणार.
मराठवाड्यात २५ हजार हेक्टरात फळबागा तयार करणार व अनुदान दुप्पट करणार, १८४५ कोटी रु. या तीन प्रकल्पांवर खर्च होणार
म्हैसमाळ, शूलिभंजन व वेरूळ पर्यटन विकास आराखड्यास मान्यता. त्यासाठी ४५३ कोटी रु. देणार
२३२ कोटींच्या माहूर विकास आराखड्यास मान्यता
लातुरात विभागीय क्रीडा संकुलाला मान्यता.
मराठवाडा वाटर ग्रीडला डीपीआर तयार झाल्यानंतर त्याच्या किमतीला मान्यता देणार
कौशल्य प्रशिक्षणांतर्गत पाच अभ्यासक्रम आठही जिल्ह्यांत सुरूकरणार
औरंगाबादेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ७ एकर जमीन उपलब्ध करून देणार, त्यासाठी १० कोटींची तरतूद.
औरंगाबादपासून ६ कि. मी. अंतरावरील करोडी येथे ट्रान्सपोर्ट हब उभारणार
सयाजीराव गायकवाड साहित्य निर्मितीचे मुख्यालय औरंगाबादला सुरू करणार
ही बैठक निव्वळ भूलभुलैया - अशोक चव्हाण
मराठवाडा पॅकेजच्या नावाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घेऊन सरकारने मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल केली असून केवळ घोषणांचीच अतिवृष्टी केली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी सोलापूरमध्ये ‘लोकमत’शी बोलताना केली.
सरकारने आज मराठवाड्यासाठी ४९ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ही तरतूद कशी करणार हे त्यांनाच माहीत. यापूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नव्या घोषणा केल्या. या घोषणांचे काय होणार? कोठून पैसा उपलब्ध करणार? कशाचा कशाला पत्ता नाही. त्यामुळे या घोषणांची पूर्तता होईल काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आमच्या काळात मंत्रिमंडळाची बैठक दोन दिवस चालायची आज मात्र केवळ दोन तासातच बैठक आटोपली. यावरूनच त्यांना बैठकीचे किती गांभीर्य आहे हेही लक्षात येते, असा टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे ज्या सुभेदारी अतिथीगृहात ही बैठक झाली त्याच्या दोन किमी परिसरात येण्यास सामान्य नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला होता. ही बाब अत्यंत चुकीची आहे. बैठक घेऊन त्यांनी केवळ सोपस्कार पूर्ण केले. मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली, असेही चव्हाण म्हणाले.
हा तर मराठ्यांना गृहीत धरल्याचा उद्वेग! - जयसिंगराव पवार
समीर देशपांडे, कोल्हापूर
मराठा समाजातील बहुतांशजण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून तुमचे-आमचे संरक्षण करतो. म्हणजेच एकीकडे आमचे पोट भरणारा आणि दुसरीकडे आमचे संरक्षणही करणारा असा हा मराठा बदलत्या परिस्थितीत चोहोबाजूंनी पिचला आहे. आतापर्यंत अनेक वर्षे मराठ्यांना सर्व पक्षांनी गृहीत धरल्याचा हा उद्वेग असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
मराठा समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. पवार म्हणाले, गेल्या ३० वर्षांत सर्वसामान्य मराठा वेगवेगळ्या पद्धतींनी अडचणीत येत गेला. प्रगती झाली नाही का? तर झाली. मात्र शहरी नागरिकांमध्ये मराठ्यांची जी प्रतिमा आहे, तसा मराठा खेड्यांमध्ये सध्या नाही. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचा सदस्य, सभापती, साखर कारखानदार अशी अनेक सत्तास्थाने मराठ्यांकडे आहेत. मात्र हेच सर्वजण म्हणजे मराठा समाज असे होत नाही. यांच्याही पलीकडे फार मोठा मराठा समाज, जो केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्याची अवस्था बिकट आहे.
मराठा समाज सर्व पक्षांत विभागला गेला आणि सर्वच पक्षांनी मराठ्यांना गृहीत धरले. ‘मराठा म्हणजे बागायतदार’ असे चित्र पुढे आले. शेकडो टन ऊस घालणारा, चारचाकी गाड्या फिरविणारा मराठा शेतकरी तुलनेत संख्येने कमी आहे. मात्र, दुसरीकडे अल्पभूधारक मराठा शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. नोकरीची हमी नाही, अशी नकारात्मकतेची मालिकाच सर्वसामान्य मराठ्यांच्या आयुष्यात गेली अनेक वर्षे सुरू आहे. आमच्या आधीच्या किंबहुना आमच्याही पिढीने हे सर्व सहन केले. मात्र आताची पिढी हे सहन करायला तयार नाही. यातूच राज्यभर हे मोर्चे निघत आहेत.
ओला दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडे
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला असून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी फडणवीस यांना मराठवाड्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. मुंडे म्हणाले, मराठवाड्याच्या हक्काच्या संस्था विदर्भामध्ये पळविण्याचे काम सुरूअसून, मराठवाड्याच्या हक्काचे या प्रदेशातच राहिले पाहिजे. आयआयएम, विधि विद्यापीठ आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्क या संस्था विदर्भात गेल्या आहेत. (प्रतिनिधी)