मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:00 PM2023-09-01T22:00:59+5:302023-09-01T22:02:05+5:30

'काही पक्षांचे कार्यकर्ते हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विनंती करतो, कायदा हातात घेऊ नका.'

Government serious about Maratha reservation; Home Minister Devendra Fadnavis's reaction to the lathicharge in Jalana | मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

googlenewsNext

जालना- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांनीही दगडफेक केली, ज्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या लाठीचार्जच्या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जालन्यातील घटना दुर्देवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपोषणकर्त्यांशी बोलले होते. आमचा विविध प्रकारे त्यांच्याशी संवाद सुरी होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे, तो एका दिवसात सुटणार नाही. आम्ही त्यांची समजूत काढत होतो, पण ते ऐकत नव्हते.'

'काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती, ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल आणि त्यात तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते, पण त्यांनी ऐकले नाही. प्रशासन आज पुन्हा गेले पण दगडफेक करण्यात आली. 12 पोलीस जखमी झाले, त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला', अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, 'लाठीचार्जमध्ये कुणी जखमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला. लाठीचार्ज कमी झाला, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तशाप्रकारची कारवाई केली नसती, तर पोलीस पथकाला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. राज्य सरकार या विषयी अतिशय संवेदनशील आहे. आम्ही मराठा समजाला आरक्षणाला दिले होते, पण नंतर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण का टिकले नाही, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असल्यामुळे कायदा कुणीही हातात घेऊ नये', असे आवाहनदेखील फडणवीसांनी केले.

काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मराठा समन्वयकाच्या नावाने हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विनंती आहे की, अशाप्रकारच्या गोष्टी करू नका, हे योग्य नाही. हा काय राजकीय प्रश्न नाही, समाजाचा प्रश्न आहे. समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्र येऊ शकत नसाल, तर तुमच्या मनात समाजाबद्दल कुठलही प्रेम नाही, असं दिसून येईल. आम्ही निश्चितच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

Web Title: Government serious about Maratha reservation; Home Minister Devendra Fadnavis's reaction to the lathicharge in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.