सरकारवर फसवणुकीची गुन्हा दाखल व्हावा; नाना पटोले यांची पुन्हा सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 05:11 PM2017-09-23T17:11:20+5:302017-09-23T19:09:46+5:30
भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे.
नागपूर - भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी थेट टीका त्यांनी केली आहे. ऐतिहासिक कर्जमाफीची रक्कम खात्यात केव्हा जमा होते. याची शेतकरी वाट बघतोय. राज्यातील कोणत्याही तलावात बारमाही पाणी राहात नाही. तरीही वर्षभराची लीज वसूल करून मच्छिमारांची फसवणूक सुरू आहे. शेतकरी व मच्छिमारांची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ४२० कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकरी व मच्छिमारांच्या बाजुने निर्णय झाला नाही, तर रस्त्यावर लढाई करू असा इशारा खासदार नाना पटोले यांनी शनिवारी दिला.
कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर न लावता मासेमार -शेतकरी संघर्ष अभियान राबविण्याची घोषणा पटोले यांनी केली आहे. या पार्श्वभूमिवर बजाजनगर येथे मच्छिमारांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, मच्छिमार संघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक बर्वे, विदर्भ मच्छिमार संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, प्रफुल्ल पाटील, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, मनू दत्ता, देविदास चवरे, रामदास पडवळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
३०जून २०१७ रोजी राज्य सरकारने काढलेला जीआर मच्छिमारांना वेठबिगार बनविणारा आहे. सामान्य माणसाची व्यथा मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. हे सरकारचे पाप असल्याचे त्यांनी मान्य केले. यावर त्यांनी दोन सदस्यीय समिती गठीत करण्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात २५ कोटी वीज ग्राहक आहेत. दररोज वीज शुल्कात वाढ सुरू आहे. एक-दोन रुपये वाढ असली तरी ही रक्कम मोठी होते. एकीकडे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. दुसरीकडे मच्छिमारांना बेरोजगार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलावाला बारमाही पाणी असेल तरच लीज देऊ अन्यथा मच्छिमार लीज देणार नाही. अशी भूमिका पटोले यांनी मांडली. राजकारण हा आमचा धंदा नाही. पण शेतकऱ्यांच्या पोटाची काळजी आहे. शेतकरी सरकारला भीक मागत नाही. आपला हक्क मागत आहे. शेतकरी व मच्छिमारांना न्याय मिळावा. यासाठी संघर्ष अभियानाला सुरूवात करण्याची घोषणा पटोले यांनी केली.
गोसेखूर्द संघावर नागपूरच्या नेत्याचा कब्जा
गोसेखूर्द प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट स्थानिक मच्छिमारांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु गोसेखूर्द मच्छिमार संघावर नागपूरच्या एका नेत्याने कब्जा मिळविला आहे. मच्छिमाराऐवजी राजकीय नेते आता मच्छिमार संघ चालवायला निघाले आहे. हा मच्छिमारांचा विश्वासघात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.