गर्भसंस्कार पुस्तकाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात जावे
By admin | Published: August 18, 2016 04:06 AM2016-08-18T04:06:50+5:302016-08-18T04:06:50+5:30
आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केलेला आहे. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात शासनाची योग्य भूमिकाच
अहमदनगर : ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केलेला आहे. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात शासनाची योग्य भूमिकाच मांडली गेलेली नाही. त्यामुळे शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करावे, अशी मागणी मूळ तक्रारदार गणेश बोऱ्हाडे, गर्भलिंग निदान विरोधातील देशपातळीवरील केंद्रीय समितीच्या सदस्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.
बोऱ्हाडे यांनी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांना लेखी निवेदनच दिले आहे. तांबे यांनी या पुस्तकात मुलगा होण्याबाबतचे उपाय सांगितलेले आहेत. हा सरळसरळ कायद्याचा भंग आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही तसे मत प्रदर्शित केले आहे. त्यानंतरच नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगमनेर न्यायालयात तांबे, पुस्तकाचे प्रकाशक अभिजीत पवार व विक्रेत्याविरुद्ध फिर्याद दाखल केली, याकडे बोऱ्हाडे यांनी लक्ष वेधले आहे.
शासकीय अधिकारी याप्रकरणात दबावाखाली आहेत. आपण तांबे यांच्या पुस्तकाबाबत तक्रार दिल्यानंतर नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य विद्यापीठाचे म्हणणे मागविले. याबाबत विद्यापीठाला गत २० जानेवारीला पत्र पाठविण्यात आले. मात्र, विद्यापीठाने तब्बल चार महिन्यानंतर म्हणजे २० मे रोजी अभिप्राय कळविला. त्यासाठी त्यांना दोनदा स्मरणपत्रे पाठवावी लागली. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनचाही (एमसीआयएम) अभिप्राय मागविला. मात्र, अद्यापपर्यंत तो मिळालेला नाही. तांबे औरंगाबाद खंडपीठात गेले व खंडपीठाने हा गुन्हा रद्द केल्याचा निकाल दिल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले. खंडपीठाचे निकालपत्रक अद्याप मिळाले नसल्याने त्यावर भाष्य करावयाचे नाही. मात्र, यासंदर्भात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात तातडीने अपिल दाखल करणे आवश्यक असल्याचे बोऱ्हाडे यांचे म्हणणे आहे.
तांबे यांनी आयुर्वेदातील ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिले, असा दावा ते स्वत: व त्यांचे समर्थक वृत्तपत्रातून करत आहेत. मात्र, पुराणातील बाबींना कायद्याची मान्यता नाही, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. पुराणात चातुर्वण्य व सतीची प्रथा सांगितली म्हणून तुम्ही त्याचे समर्थन करणार का?, असा सवाल बोऱ्हाडे यांनी केला आहे. ‘एमसीआयएम’ला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही तांबे यांची वैद्यकीय पदवी मिळत नाही. पदवी हरविल्याचे सांगितले जाते. मग तांबे यांनी वैद्यकीय सेवेसाठी १९८७ साली नोंदणी कशाच्या आधारे केली व १९९१ नंतर त्यांनी नोंदणीचे नूतनीकरण केले नसतानाही ‘एमसीआयएम’ने कारवाई का केली नाही? असा बोऱ्हाडे यांचा प्रश्न आहे. पदवी असेल तर ती जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
तक्रारदाराच्या जीवाला धोका
गर्भसंस्कार पुस्तकाबाबत तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी आपल्या जीवाला धोका असल्याने संरक्षण मिळावे, असा अर्ज गणेश बोऱ्हाडे यांनी पोलिसांकडे दिला आहे.
देशात कोणतीही वैद्यकीय उपचार पद्धती (पॅथी) ही घटनेच्या चौकटीतच चालवावी लागेल. आयुर्वेदातील जुन्या ग्रंथांत मुलगा होण्याबाबत काही उपाय सांगितले म्हणून तसा प्रचार करणे हा गुन्हा आहे. बालाजी तांबे यांनी ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकात तसा प्रचार केलेला आहे. त्यामुळे शासनाने सर्वोच्च न्यायालयात जाणे आवश्यक आहे, अन्यथा काळ सोकावण्याचा धोका आहे. कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्याकडे आहे.- अॅड. वर्षा देशपांडे, प्रवर्तक, लेक लाडकी अभियान