लष्कराचे श्रेय सरकारने लाटू नये
By admin | Published: October 8, 2016 04:13 AM2016-10-08T04:13:42+5:302016-10-08T04:13:42+5:30
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
अमरावती : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई शत्रूला वेगळा संदेश देणारी आहे. ‘उरी’च्या बदल्याचे श्रेय खऱ्या अर्थाने लष्कराचे आहे. परंतु या कारवाईचा मोदी सरकारने गवगवा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.
अमरावती येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘संपुआ’ सरकारच्या काळात चारवेळा ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यात आले, पण देशहित लक्षात घेऊन त्याचे ‘मार्केटिंग’ आम्ही केले नाही. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे राजकीय फायद्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि भाजपाची मंडळी करीत आहेत. (प्रतिनिधी)
>तामिळनाडूत मिळू शकते, तर महाराष्ट्रात का नाही?
तामिळनाडूत ७४ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते, तर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देताना हे निकष का लावले जात नाहीत, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. आरक्षणाची मागणी करताना यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मराठ्यांना आरक्षण देताना दलित, आदिवासी, ओबीसी व इतर समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यात आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या!
कोपर्डी येथील एका युवतीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली. गुन्हेगाराला जात, पात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी पवारांनी या वेळी केली. भाजपाने मुस्लिमांना आरक्षण देण्यास नकार दिल्याबाबत त्यांनी चांगलाच समाचार घेतला.