गायींची जबाबदारी शासनाने घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2015 12:17 AM2015-11-08T00:17:38+5:302015-11-08T00:17:38+5:30
महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केल्यानंतर येथील गायींचे संगोपन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा घरचा आहेर केंद्रीय महिला
पुणे : महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केल्यानंतर येथील गायींचे संगोपन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा घरचा आहेर केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शनिवारी राज्यातील भाजपा सरकारला दिला.
प्राण्यांच्या पालन पोषणासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी पीपल फॉर अॅनिमल (पीएफए) संस्थेतर्फे पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गोशाळा स्थापन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पशुधन कल्याण मंडळाकडे दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्र शासनाने गोशाला स्थापन कराव्यात याबाबत मी पाठपुरावा करत आहे. गावातील गायरानांची संख्या कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचे पालन करणे शक्य होत नाही, असे त्या म्हणाल्या.
आॅक्सिटोसिनला मी नेहमी विरोध केला. मात्र, सुमारे तीन वर्षांपासून ठाण्यात एका खासगी कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या आॅक्सिटोसिन या घातक औषधामुळे गाई, म्हशींवर वाईट परिणाम झाले आहेत. आॅक्सिटोसिन गायींच्या दुधातून मानवाच्या शरीरात जाते. केंद्र शासनानेही याबाबत आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
साहित्य, अभिनय आदी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला शासनाने पुरस्कार द्यावा, अशी मागणी समाजातील विविध क्षेत्रातून केली जाते. त्यामुळे हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार परत करणे म्हणजे देशाचा अपमान आहे, असे मत मनेका गांधी यांनी व्यक्त केले. हे सर्व पुरस्कार आमच्या सरकारने दिलेले नाहीत. काँग्रेसच्या काळात पुरस्कार देण्यात आले असून, त्यांनाच परत करावेत, असेही त्या म्हणाल्या.