मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:03 PM2023-12-13T14:03:22+5:302023-12-13T14:04:00+5:30
हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
Vijay Wadettiwar on Students Mental Stress : नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
वडेट्टीवार म्हणाले की, मुलं मानसिक तणावात शिकत आहेत. त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे शाळेच्या वेळा बदलण्यासाठी शासनाकडे विचारणा केली होती. राज्यात शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे झोप पूर्ण होत नाही. मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येते. मुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शाळेच्या वेळा बदलल्या पाहिजेत. अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.