राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:47 AM2018-11-01T05:47:01+5:302018-11-01T06:52:24+5:30
केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी केले.
मीरा रोड : अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी तेथील जमीन ताब्यात घेऊन मंदिराची उभारणी करायची, इतकाच विषय शिल्लक असून केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी केले.
मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे. याला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला. उद्धव ठाकरे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत बुधवारपासून संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची 3 दिवसांची बैठक सुरू झाली. बैठकीसाठी ३५० प्रतिनिधी आले आहेत. संघाच्या विस्ताराचा, संघ कुठे कमी आहे, त्या ठिकाणी संघ कसा वाढवायचा, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोर्टावर ठपका
वैद्य म्हणाले, की १९९४ मध्ये यूपीए सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन तेथे हिंदूंचे मंदिर होते, असे म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाला तेथे मंदिराचे अवशेष सापडले. तरीही कोर्ट अनावश्यक हा विषय लांबवते आहे.