चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे!, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 03:11 AM2019-02-16T03:11:42+5:302019-02-16T03:11:56+5:30

सरकारने चांगले काम केले तर कौतुक करा आणि चुकीचे केले तर कठोर टीकादेखील करा. लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आपले सरकार चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली.

Government stand firmly with the fourth column, Chief Minister's assurance | चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे!, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे!, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next

मुंबई : सरकारने चांगले काम केले तर कौतुक करा आणि चुकीचे केले तर कठोर टीकादेखील करा. लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आपले सरकार चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली.
वृत्तपत्रांसाठी शासकीय जाहिरात धोरण जाहीर करून मोठा दिलासा दिल्याबद्दल विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन आणि महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका समारंभाचे आयोजन सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले प्रतिष्ठित वृत्तपत्रांचे मालक, संपादक यांची मोठी उपस्थिती समारंभाला होती.
समारंभ समितीचे संयोजक लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापसिंह जाधव, इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे चेअरमन विवेक गोयंका, गुजरात समाचारचे चेअरमन बाहुबली शहा, बेनेट अ‍ॅण्ड कोलमन लिमिटेडचे प्रेसिडेंट (रेव्हेन्यू) शिवकुमार सुंदरम्, इल्नाचे उपाध्यक्ष प्रकाश पोहरे, विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज विविध माध्यमे समोर आली आहेत. या नवनव्या माध्यमांची मूल्ये निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यांतून ती स्वैराचाराकडे जाण्याची भीती असते. मात्र, वृत्तपत्रांना विश्वासार्हता सांभाळून, खर्चाचे गणित सांभाळून काम करावे लागते. इलेक्ट्रॉनिक मीडियानेही जाळे विस्तारले आहे. गेल्या १० वर्षांत समाजमाध्यमांनीही आपला पगडा निर्माण केला आहे. असे असले तरी समाजमन बनविण्याचे काम हे वृत्तपत्रेच करतात. विश्वासार्हताही त्यांचीच सर्वांत जास्त आणि मूल्ये शाश्वत आहेत.
वृत्तपत्रांच्या जाहिरातींचे दर शासनाने वाढविले म्हणून जाहिरातींचे आकार कमी केले जातील, ही भीती अनाठायी असून तसे अजिबात केले जाणार नाही आणि जे नवीन दर निश्चित केले आहेत त्याला अनुसरून आर्थिक तरतूद वेळोवेळी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारने जाहिरातींवर इतके कोटी खर्च केले अशी टीका काही वेळा होते. ती योग्य नाही. आपले कुठले उत्पादन विकण्यासाठी सरकार जाहिराती करीत नाही; तर लोकसंवाद आणि जनतेचे व्यापक हित हा त्यामागील मुख्य उद्देश असतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मी सत्कार घेत नाही, वाढदिवस साजरा करीत नाही; पण एकदा विजयबाबूंनी ठरविले की ते तो विषय सोडत नाहीत. त्यांच्या आग्रहामुळे मी आजच्या समारंभाला आलो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विजय दर्डा म्हणाले की, ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना,’ असे सरकार आणि वृत्तपत्रांचे असते. आम्ही सरकारवर अनेकदा टीका करतो, पण या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे कौतुक आम्ही सगळ्यांनीच मुक्तकंठाने केले आहे. मुख्यमंत्री धोरणी, उद्ममी, संयमी असून ते वयाने लहान असले तरी प्रचंड प्रगल्भता त्यांच्याकडे आहे. वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदाचे वाढते दर, अन्य यंत्रणेवरील वाढत्या खर्चाने मोठे आव्हान उभे केले आणि या व्यवसायाचे पावित्र्य टिकविता येईल की नाही अशी भीती वाटत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. गेल्या कित्येक वर्षांत सरकारने एवढी भरीव मदत वृत्तपत्रांना केली नाही.
प्रतापसिंह जाधव म्हणाले, की गेल्या ५० वर्षांतील मुख्यमंत्री मी जवळून पाहिले. मराठा समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले; पण या समाजाला आरक्षण हे फडणवीस यांनी दिले. बहुजन समाजाला विश्वासात घेऊन ते पुढे जात आहेत. निर्णयक्षमतेबाबत यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाणांच्या पंक्तीत बसणारे हे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिरातींचे दर मोठ्या प्रमाणात वाढवून या क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी शुभेच्छा मी त्यांना देतो.
विवेक गोयंका म्हणाले, की गेल्या तेहतीस वर्षांत एक्स्प्रेस समूहाची धुरा सांभाळताना मी कोणत्याही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलेले नाही, पण मी फडणवीस यांचे कौतुक करतो. ते ‘परफेक्ट जंटलमन’ आहेत. त्यांना मी आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी शुभेच्छा देतो. ते पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिरातींना व्यावसायिक दर द्यावा, अशी मिश्कील टिप्पणीही गोयंका यांनी केली.
प्रकाश पोहरे म्हणाले की, मी शेतकºयांची बाजू मांडताना अनेकदा सरकारवर प्रहार करतो. मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना असतानाही शासकीय जाहिरात धोरणाची समिती त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली केली, हा त्यांचा मोठेपणा आहे.
श्रीकृष्ण चांडक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे वृत्तपत्रांना तग धरता येईल. लहानमोठ्या सर्वच वृत्तपत्रांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बाहुबली शहा यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या समारंभाला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, माहिती जनसंपर्क विभागाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेशसिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया, मेरिटाइम बोर्डचे सीईओ विक्रमकुमार, फ्री प्रेसचे अभिषेक कारानी, जन्मभूमीचे कुंदन व्यास, पुण्यनगरीचे प्रवीण शिंगोटे, देशदूतचे विक्रम सारडा, हिंदुस्थानचे विलास मराठे, दिलीप एडतकर, माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर, शिवाजी मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन लोकमत मुंबईचे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी केले.

Web Title: Government stand firmly with the fourth column, Chief Minister's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.