बोगस पॅथॉलॉजीबाबत सरकार अजूनही ढिम्म
By admin | Published: June 15, 2015 02:30 AM2015-06-15T02:30:58+5:302015-06-15T02:30:58+5:30
राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. या निदानाच्या काळाबाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि
पूजा दामले, मुंबई
राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. या निदानाच्या काळाबाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि परिषदेतही या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. या वेळी बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर सरकारतर्फे काहीही पाऊल उचलण्यात आलेले नाही. कारवाईच्या बाबतीत सरकार ढिम्म असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळी अधिवेशन काही दिवसांवर आले आहे, पण कोणतीही कार्यवाही यासंदर्भात झालेली नाही. ठोस उत्तर न देता अजून वेळ लागेल, असे मोघम उत्तर विनोद तावडे यांच्यातर्फे त्यांचे मीडिया को-आॅर्डिनेटर गोविंद येतयेकर यांनी दिले.
एमबीबीएस पूर्ण केल्यावर पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या डॉक्टरांनाच स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवण्याची मुभा आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पॅथॉलॉजिस्टची संख्या राज्यात अवघी २ हजार एवढी आहे. योग्य निदान न झाल्यास डॉक्टर योग्य ते उपचार करू शकत नाहीत. पॅथॉलॉजी शिक्षण न घेतलेल्या व्यक्ती स्वतंत्ररीत्या पॅथॉलॉजी लॅब चालवून रुग्णांची फसवणूक करीत आहेत. रुग्णांची फसवणूक थांबवली पाहिजे. पण अजूनही अध्यादेश निघालेला नसल्याने बोगस पॅथॉलॉजिस्ट फसवणूक करीत आहेत. आता कारवाईची वेळ आली असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रो बायोलॉजिस्ट या संघटनेने म्हटले आहे.