सरकार अधिक भक्कम झाले : मुख्यमंत्री

By admin | Published: February 24, 2017 04:17 AM2017-02-24T04:17:34+5:302017-02-24T04:17:34+5:30

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर माझे सरकार कोसळणार असे भाकित काही नेते वर्तवित होते.

Government strengthened: Chief Minister | सरकार अधिक भक्कम झाले : मुख्यमंत्री

सरकार अधिक भक्कम झाले : मुख्यमंत्री

Next

यदु जोशी /मुंबई
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर माझे सरकार कोसळणार असे भाकित काही नेते वर्तवित होते. आजच्या निकालाने ते केवळ भक्कमच झालेले नाही तर राज्यातील जनतेच्या विश्वासाच्या मजबूत पायावर ते कणखरपणे उभे असल्याचे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.
मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी झाल्यानंतर नागपूरला रवाना होण्यापूर्वी लोकमतशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार स्थिर आहे आणि ते पाच वर्षे टिकणारच हे मी आधीपासूनच म्हणत होतो. त्यावर टीकाटिप्पणी झाली पण राज्यातील जनतेने या सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला पारदर्शक विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यास सांगितले आहे आणि आम्ही ती करीत आहोत. त्यावर शहरी आणि ग्रामीण जनतेनेही आज पसंतीची मोहोर उमटवली आहे. सरकारच्या पाठिंब्याबाबत मला कोणीच कधी नोटीस दिली नव्हती अन् देणारही नाही हा माझा विश्वास आहे.
प्रश्न : मुंबईत महापौरपद भाजपाला मिळावे असे आपल्याला वाटते काय?
मुख्यमंत्री : निश्चितच. तसा आमचा प्रयत्नदेखील राहील. का राहू नये? आम्ही जोरदार यश मिळविले आहे. भाजपाच्या नेतृत्वात मुंबईकरांनी मान्यता दिली आहे. तथापि, महापौरपदाबाबत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही घेऊ.
प्रश्न : मुंबईचे महापौरपद मिळविण्यासाठी पारदर्शकतेचा अजेंडा बाजूला ठेवणार का?
मुख्यमंत्री : कोणत्याही परिस्थितीत नाही. तीच आमची मुख्य अट असेल. ज्या मुद्यावर लढलो त्यावर तडजोड स्वीकारणे ही मतदारांशी प्रतारणा असेल.
प्रश्न : महापालिका वा जिल्हा परिषदांमध्ये प्रसंगी काँग्रेस वा राष्ट्रवादीशी युती करण्याची वेळ आली तर?
मुख्यमंत्री : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याकडे आमचा साधारणपणे कल नसेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कौल मिळालेले असले तरी पक्षाचे एक धोरण असते आणि त्यानुसारच निर्णय घेतले जातात.
प्रश्न : शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांवर जे आरोप केले त्याचे काय? ते विसरून युतीची आपली तयारी असेल का?
मुख्यमंत्री : लाखो मतदारांनी आम्हाला पसंती देऊन त्या आरोपांचे परस्परच उत्तर दिलेले आहे. अशा आरोपांनी कोणाचे किती नुकसान होते हेही निकालात दिसले आहे.
प्रश्न : पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणचे निकाल अपेक्षित होते का? अजित पवारांना आपण धक्का कसा दिला?
मुख्यमंत्री : मी नाही मतदारांनी राष्ट्रवादीच्या कारभाराला धक्का दिला. लोक त्यांच्या कारभाराला कंटाळले होते आणि त्यांना आम्ही आश्वासक वाटलो. राज्यात मी जिथेही प्रचाराला गेलो तिथे पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारबद्दलचा विश्वास मला जाणवत होता. राज्यभरात मिळालेले यश हे पंतप्रधान मोदी यांनी पारदर्शक व गतिमान कारभाराचा घालून दिलेला अजेंडा, भाजपाचे तमाम पदाधिकारी, मंत्री, नेते, आमदार, खासदार आणि सामान्य कार्यकर्ते यांनी केलेली प्रचंड मेहनतीचे फळ आहे.
प्रश्न : उद्धव ठाकरे आणि आपल्यातील कटूता निकालानंतर संपली असे समजायचे काय?
मुख्यमंत्री : माझ्या बाजूने ती मी संपविली आहे. त्यांच्याकडूनही माझी तीच अपेक्षा असेल. मी पातळी सोडून कधीही टीका केली नाही. पारदर्शकतेवर बोलताना मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली एवढेच. पुन्हा एकदा सांगतो मी त्यांची औकात काढली नव्हती. भाजपाची औकात दाखवू असेच म्हटले होते आणि औकातीचा अर्थ ताकदा वा पात्रता असा होतो.


पंकजांचा राजीनामा पण तो स्वीकारणार नाही
बीडमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा आपल्याकडे पाठविलेला आहे पण आपण तो स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.


एका निवडणुकीतील कामगिरीचा निकष नाही
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत एखाद्या जिल्ह्यात अपयश आले म्हणून त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणे योग्य होणार नाही. त्यांच्या सर्वंकष कामगिरीचे मूल्यांकन करावे लागेल आणि ते एका निवडणूक निकालाने होत नसते.
अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेत यापूर्वीही आम्हाला फारसे यश मिळत नव्हते. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी यावेळी प्रचंड मेहनत घेतली पण अपेक्षित यश मिळाले नाही, मेहनतीत ते कुठेही कमी पडले नाहीत हे मी स्वत: पाहिले आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांची पाठराखण केली.


भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदारांनी केलेली मेहनत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पारदर्शक व गतिमान कारभाराच्या मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असलेली वाटचाल, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंचायतींपासून संसदेपर्यंत भाजपाला यश मिळावे यासाठी केलेले मार्गदर्शन याचा हा परिपाक आहे. मुंबईत भाजपाचाच महापौर होईल, हा माझा विश्वास आहे.
- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा


मुंबईत शिवसेना-भाजप या दोन्हीही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण शिवसेना आणि भाजप या दोघांनाही काँग्रेसला घेऊन सत्ता स्थापन करायची नाही. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही नैसर्गिक मित्र आहेत. त्यामुळे आम्ही दोघेही एकत्र येऊन सत्ता स्थापन करू. मुंबईतील शिवसेना व भाजप समन्वयासाठी मला पक्षाने जबाबदारी दिली तर ती मी नक्कीच पूर्ण करेन. कटुता ही निवडणुकीपुरती होती, ती आता संपली आहे, त्यामुळे शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करण्यास काहीही हरकत नाही. -चंद्रकांतदादा पाटील, महसूलमंत्री

Web Title: Government strengthened: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.