मराठा आरक्षणाबाबत सरकारची चालढकल
By admin | Published: May 4, 2017 04:14 AM2017-05-04T04:14:19+5:302017-05-04T04:14:19+5:30
मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही, सरकार आरक्षण देण्याबाबत चालढकल करत असल्याचा आरोप
मुंबई : मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही, सरकार आरक्षण देण्याबाबत चालढकल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय मराठा पार्टीने केला आहे. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी यंदाच्या पनवेल निवडणुकीत ५० ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
पार्टीचे अध्यक्ष अंकुश पाटील म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशावर विश्वास आहे. मात्र, सरकार मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडताना दिसत नाही. केवळ चालढकल करून वेळकाढूपणा सुरू असल्याचे दिसते. अॅट्रोसिटी कायद्यात बदल करण्याची मागणीही समाजाने केली होती. मात्र, सरकारने अॅट्रोसिटी कायदा अधिक कडक करत, मराठा समाजाला दुखावले आहे. एकीकडे राज्यात तूर खरेदी थांबल्याने व कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येवाचून पर्याय नाही. परिणामी, सरकारला धक्का देण्यासाठी पनवेल महापालिकेपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय पार्टीने घेतला आहे.’ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडण्यासाठी पार्टीने चार उमेदवारांची यादीही या वेळी जाहीर केली. लवकरच उरलेल्या ४६ उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)