सरकारचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; जाहीर माफी मागावी - सुनिल तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 10:27 PM2018-07-13T22:27:18+5:302018-07-13T22:28:03+5:30
नागपूर – इयत्ता ६ वीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेत धडे शासनाने प्रसिद्ध केल्याची माहिती आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करुन सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सरकारच्या या बेगडी मराठीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आला असून हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सांगत सरकारने दिलगिरी व्यक्त करुन जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मराठी भाषेचा अपमान असून सरकार किती लाचारी करणार ? हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नाही का संतप्त सवालही सुनिल तटकरे यांनी सभागृहात केला.
दरम्यान या गंभीर विषयावर जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबत सरकारने खुलासा करावा आणि तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश सरकारला दिले.
तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरु आहे, असा आरोप आमदारांनी केला. या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी याच मुद्द्यावरुन घोषणाबाजी सुरु केली. अखेर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.