सरकारी अनुदानित वसतिगृहातील मुलांना भरावे लागते अधिकचे शुल्क
By admin | Published: July 12, 2017 01:58 AM2017-07-12T01:58:58+5:302017-07-12T01:58:58+5:30
मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च - एप्रिल महिन्यात संपल्या. पण, मुंबई विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे अजूनही निकाल लागला नाही. त्यामुळे विद्यार्थी अजूनही वसतिगृहात राहात आहेत. या विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. तरी, या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे. विद्यापीठाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये अशी मागणी स्टुण्डट लॉ कौन्सिलतर्फे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ५ हजार ८७० रुपये तर, अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ८२० रुपये शुल्क आकारले जाते. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांनी वसतिगृहात राहण्यासाठी दररोजचे १०० रुपये शुल्क भरावयाचे आहे. मुंबईबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी अनुदानित वसतिगृहांचा आधार असतो. विद्यार्थी वसतिगृहात राहिल्यास त्यांना महाविद्यालयात लेक्चरला जाणे, अभ्यास करणे सोपे जाते. तरी आता विद्यार्थ्यांना दररोज १०० रुपये शुल्क आकारणे योग्य नसल्याचे मत कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे.
विद्यापीठाचे निकाल वेळेत लागले असते तर विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता आले असते. आता ते शक्य नाही. निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे आवश्यक आहे. सरकारी आदेशानुसार, विद्यार्थ्यांकडून १०० रुपये आकारले जात आहेत. विद्यापीठाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे हेड सुप्रिटेण्डट एस.के. त्रिपाठी यांनी मात्र असा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. ज्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिली आहे परंतु अशा विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही त्यांच्याकडे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या गुणपत्रिका मागवल्या आहेत.