चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:22 AM2024-10-07T06:22:25+5:302024-10-07T06:23:27+5:30
चांगल्या व्यक्तींचा सन्मान अन् वाईट व्यक्तींना शिक्षा करीत नाही, ती व्यवस्था म्हणजे सरकार होय, असे परखड मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : चांगल्या व्यक्तींचा सन्मान अन् वाईट व्यक्तींना शिक्षा करीत नाही, ती व्यवस्था म्हणजे सरकार होय, असे परखड मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी अरुण बोंगीरवार लोकसेवा उत्कृष्टता पुरस्कार वितरण समारंभात बोलताना व्यक्त केले.
गडकरी यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ४५० आदर्श शाळा निर्माण करणारे जितेंद्र डुडी (सध्या सातारा जिल्हाधिकारी), सोलापूरच्या पोलिस अधीक्षक असताना सुमारे ७० गावांतील हातभट्टी दारूचा व्यवसाय मोडून या व्यवसायात गुंतलेल्या शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन करणाऱ्या तेजस्वी सातपुते (सध्या मुंबईतील पोलिस उपायुक्त) आणि भूमी अभिलेख विभाग ऑनलाइन करणाऱ्या पुणे येथील उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांना यावर्षीच्या अरुण बोंगीरवार लोकसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या वतीने आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या सहकार्याने दरवर्षी दिला जातो. या कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, छत्तीसगडचे शिक्षण सचिव सिद्धार्थ परदेशी, नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, फाउंडेशनच्या अध्यक्ष लता बोंगीरवार व माजी प्रशासकीय अधिकारी प्रमोद बोंगीरवार व्यासपीठावर उपस्थित होते.