Rohini Khadse : "सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण...", लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:49 PM2024-08-09T13:49:28+5:302024-08-09T13:51:10+5:30
Rohini Khadse : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झाली आहे.
पुणे : यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. मात्र, या योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिनी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. महिलांना पैसे नकोत पण महिलांना नेमकं काय हवंय? याबाबत आताचं सरकार अज्ञानी असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झाली आहे. या यात्रेची पहिली सभा जुन्नरच्या लेण्याद्रीत झाली आहे. यावेळी रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला १५०० रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवा आहे."
पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या की, "आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या १५०० रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. यांना वाटतं महिलांचं मन फक्त पैशात अडकलं आहे. पण, त्यांना महिला अद्याप समजल्याच नाहीत," असं म्हणत रोहिण खडसे यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.