विरोधकांपुढे सरकार सपशेल झुकले!
By admin | Published: July 15, 2015 12:48 AM2015-07-15T00:48:19+5:302015-07-15T00:48:19+5:30
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत स्वत:च आणलेली चर्चा सत्ताधारी पक्षाला थांबवून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर बऱ्याच घडामोडी घडल्या.
अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, पण त्यातही कोणताच तोडगा निघता नाही. कर्जमाफी देणार नाही असे आपण म्हटलेलेच नाही, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या बैठकीत केला. हा खुलासा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगावा असेही ठरले.
कर्जमाफीवरुन दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत गोंधळ चालू असतानाच कामकाज रेटून नेण्याच्या सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी निषेध करत बहिष्कार टाकला आणि विधानभवनातच असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ विरोधकांनी बैठक मांडली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा या जागेचा असा उपयोग झाला असेल. माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, छगन भूजबळ असे अनेक नेते विधानभवनात जमिनीवर बसल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि ते पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढून घेण्यासाठी तेथे गर्दी जमली. (विशेष प्रतिनिधी)
अध्यक्षांच्या दालनातील बैठक निष्फळ !
अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सगळे नेते होते. कर्जमाफी देणार नाही असे का बोललात, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला गेला. तेव्हा आपण असे बोललोच नाही, आपल्या तोंडी तसे विधान एका वृत्तपत्राने (लोकमत नव्हे) घातले, असा खुलासा फडणवीस यांनी केला. कोणताच निर्णय न होता ती बैठक संपली.