‘सरकारी’ तूरडाळ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

By admin | Published: August 30, 2016 02:09 AM2016-08-30T02:09:36+5:302016-08-30T02:09:36+5:30

राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या भावात उपलब्ध करून दिलेली तूरडाळच आता महागात पडू लागली आहे.

'Government' waiting for the customers of Turadal | ‘सरकारी’ तूरडाळ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

‘सरकारी’ तूरडाळ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

Next

पुणे : राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या भावात उपलब्ध करून दिलेली तूरडाळच आता महागात पडू लागली आहे. घाऊक बाजारात तूरडाळीचे भाव झपाट्याने कमी होत असल्याने किरकोळ बाजारातही तूरडाळ स्वस्त झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या ९५ रुपये किलोच्या कथित ‘स्वस्त’ डाळीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.
तूरडाळीचे वाढलेले भाव पाहून केंद्र सरकारने राज्यांना ‘नाफेड’मार्फत तूरडाळ उपलब्ध करून दिली. ही डाळ शिधापत्रिकेवर १०३ रुपये आणि व्यापारी दुकाने, मॉल्स यांच्याकडे ९५ रुपये किलो भावाने विकण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पुण्यात दि पूना मर्चंट्स चेंबरमार्फत मार्केट यार्डातील भुसार बाजारातील १० ते १२ व्यापारी, तसेच शहरातील मॉल्स व इतर रिटेल दुकाने अशा ४५ ठिकाणी ही डाळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील आठवड्यात बुधवारपासून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विक्रीला सुरुवात करण्यात आली. त्या वेळी घाऊक बाजारात तूरडाळीचे भाव १०० रुपये, तर किरकोळ बाजारात ११० ते १२० रुपयांपर्यंत होते. त्यामुळे ९५ रुपयांची डाळ खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर घाऊक बाजारात भावात झपाट्याने घट होत गेली. सोमवारी हे भाव ७५ ते ८५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
घाऊक बाजारात भाव उतरत असल्याने किरकोळ बाजारातही तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागली आहे. काही व्यापारी तसेच दुकानदारांंनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या डाळीपेक्षा २ ते ५ रुपयांपर्यंत भाव कमी करून विक्री सुरू केली आहे. त्यामुळे साहजिकच शासनाच्या डाळीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
‘शासनाच्या स्वस्तातल्या तूरडाळीसाठी ग्राहकांची रांग लागेल, अशी अपेक्षा सुरुवातीला होती. मात्र, आतापर्यंत खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे. तूरडाळीचे भाव घटत चालल्याने या डाळीची विक्री होत नाही,’ असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

Web Title: 'Government' waiting for the customers of Turadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.