सरकार खरेदी करणार कांदा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जपानमधून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 06:36 AM2023-08-23T06:36:17+5:302023-08-23T06:36:55+5:30

वाणिज्यमंत्री गोयल- कृषिमंत्री मुंडे चर्चा सुरू असताना निर्णय जाहीर

Government will buy onion | सरकार खरेदी करणार कांदा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जपानमधून घोषणा

सरकार खरेदी करणार कांदा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जपानमधून घोषणा

googlenewsNext

सुनील चावके

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढीमुळे महाराष्ट्रात कांद्याचे भाव गडगडण्याची शक्यता निर्माण झाल्याने मंगळवारी केंद्राने राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) यांच्यामार्फत राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा प्रतिक्विंटल २,४१० रुपये दराने खरेदी करण्याची घोषणा केली. राजधानी दिल्लीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत मंगळवारी कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या या निर्णयाची ट्विटरवर घोषणा केली.

अहमदनगर, नाशिक, लासलगावसह विविध केंद्रांवरून २ लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास २ लाख टनांपेक्षाही जास्त कांदा खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात मंगळवारी दुपारी १२ पासूनच सुरू होत असल्याची घोषणा पीयूष गोयल यांनी केली. सकाळी दहा वाजता ८, तीन मूर्ती मार्ग या पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी कांद्याच्या प्रश्नावर निवेदन सादर करून धनंजय मुंडे त्यांच्याशी चर्चा करीत असताना साडेदहा वाजता ट्वीट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राच्या कांदा खरेदी निर्णयाची माहिती दिली. मुंडे-गोयल यांची बैठक सव्वाअकरा वाजता संपली.

राजकारणाला कांद्याची फोडणी

मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवून अचानक ४० टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर राजकारणही चांगलेच तापले असून राज्यातील नेतेमंडळींमध्ये तू-तू, मैं-मैं सुरू झाली आहे. सत्ताधारी आपण शेतकऱ्यांचे कसे भले करत आहोत, हे बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
केंद्र सरकारने कांदा खरेदीबाबत घेतलेला निर्णय अपेक्षा पूर्ण करणार नाही. हा कांदा टिकणारा आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.

जपानमधून फडणवीस यांनी हलविली सूत्रे

‘राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. प्रतिक्विंटल २४१० या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल,’ असे फडणवीस यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

सोलापूरमध्ये कांद्याला २,७०० रुपयांचा भाव

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सध्या सरासरी १,५०० ते २,७०० रुपयांचा दर मिळत आहे. सोमवारी ११० ट्रक कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन १५० ट्रक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिवाय प्रतिक्विंटल १,५०० ते २,७०० सरासरी दर मिळत आहे. चांगल्या मालाला ३,५०० रुपयांचा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोलापूर बाजार समितीतील कांदा मार्केट सुरळीतपणे सुरू असल्याचे व्यापारी संचालक केदार उंबरजे यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी 

केंद्र व राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून यापूर्वीही नाफेड व एनसीसीएफमार्फत राज्यातील ३ लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारने खरेदी केला आहे. आता आणखी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्यात येत असून, कांद्याचे भाव उत्पादक आणि ग्राहकांच्या दृष्टीने संतुलित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.
- पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री

मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता अजित पवार हे गोयल यांच्याशी दूरध्वनीवर बोलले. मुख्यमंत्री शिंदेंचे  गोयल यांना तीन वेळा फोन आले. उत्पादकांचे नुकसान होऊ नये ही कृषिमंत्री म्हणून माझ्यावरही जबाबदारी आहे.
- धनंजय मुंडे, कृषिमंत्री

कांद्याला ४ हजार रुपये दर द्यावा

केंद्र सरकारने प्रतिक्विंटल २,४१० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, हा दर कमी आहे. या दरात शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये दर द्यावा.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Government will buy onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.