महाविकास आघाडीत एकमत नाही; ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल; नारायण राणेंचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:24 PM2020-08-10T14:24:29+5:302020-08-10T14:31:14+5:30
सुशांत सिंग प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई – भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडीत एकमत नाही, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत त्यामुळे सरकार चालताना दिसत नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हे सरकार राहील असा पुनरुच्चार राणेंनी केला आहे.
याबाबत नारायण राणे म्हणाले की, सध्या सरकार चालत नाही, प्रत्येक पक्षात वाद आहेत, महाविकास आघाडीत एकमत नाही. त्यामुळे सरकार चालणार कसं? जेमतेम हे सरकार सप्टेंबरपर्यंत चालू शकेल असा दावा त्यांनी केला आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच सुशांत सिंग प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप काम आहे, आम्ही मोकळे आहोत, कधी कर्नाटकात येताय, मी येतो असं संजय राऊतांना त्यांनी आव्हान दिलं आहे. संजय राऊतांना मी नेता मानत नाही, मी जाईन त्यांनी यावं असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहे लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवायचं त्यासाठी हा वाद पेटवला जात आहे. मात्र सुशांतचा खून की आत्महत्या याचा तपास सुरु आहे असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.
सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते पोलिसांना द्यावेत असं वक्तव्य शिवसेनेने केले होते, या प्रकरणात आदित्यचं नाव जोडून युवा नेत्याचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा सुडाचा डाव विरोधकांचा आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सरकार कोणालातरी वाचवायचा प्रयत्न करत आहे अशा शब्दात नाव न घेता विरोधक शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. तर यापूर्वीही नारायण राणे यांनी १५ दिवसांत राज्य सरकार पडेल अशाप्रकारे दावा केला होता.