लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 11:30 AM2020-04-03T11:30:24+5:302020-04-03T11:38:33+5:30

शासनाला कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल

The government will have to increase the number of corona tests | लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके

लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग आपल्याला पुढील सहा महिने तरी पाळावे लागणार  आपला देश सामूहिक संसर्गाच्या (कम्युनिटी ट्रान्समिशन) उंबरठ्यावर ७ एप्रिलनंतर रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसेल

प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी सध्या लॉकडाऊन घोषित केले आहे. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर देशात काय परिस्थिती असेल, शासनाकडून काय पावले उचलली जाणे अपेक्षित आहे? याबाबत जन आरोग्य अभियानाचे सहसमन्वयक डॉ. अनंत फडके यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लॉकडाऊन १४ एप्रिलला संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली, असे समजण्याचे कारण नाही. आता शासनाकडून चाचण्यांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. त्यातून जास्तीत जास्त रुग्णांचे निदान होऊन त्यांचे विलगीकरण करता येईल. सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पुढील सहा महिने तरी पाळावे लागणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून काय पावले उचलली जावीत?
- इटलीसारख्या देशामध्ये एकाच दिवसात कोरोनाच्या केस एकदम अंगावर आल्या. अमेरिकेतील आकडा अविश्वसनीय वाटेल इतका वाढला. तसे होऊ नये व रुग्णांचा टप्प्याटप्प्याने शोध घेता यावा, रुग्णांचे विभाजन होईल, हा भारतातील लॉकडाऊनमागचा हेतू आहे. एकमेकांपासून किमान पाच-सहा फूट दूर राहणे, सारखे हात धुणे, सामाजिक स्वच्छता बाळगणे, सार्वजनिक वाहतूक सेवा थांबवणे हे सर्व उपाय सध्या गरजेचे आहेत. सातत्याने हात धुणे, बाहेकून आलेल्या वस्तू धुऊन घेणे हे आपल्याला किमान वर्षभर सुरू ठेवावेच लागेल.  तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या जास्तीत जास्त रुग्णांचे लवकर निदान होणे आणि त्यांचे विलगीकरण करणे. असे केल्याने आजार पसरण्याचे प्रमाण थांबू शकेल. त्यासाठी सरकारला कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण व त्याबाबत धोरण ठरवावे लागेल. सध्या परदेशातून आलेले रुग्ण, त्यांच्या संपर्कात आलेले रुग्ण यांचीच तपासणी करण्याचे आदेश सध्या देण्यात आले आहेत. ज्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत आहेत, अशा सर्वांची तपासणी होणे गरजेचे आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले तरच जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचता येईल.
 

लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. तोवर साथ आटोक्यात आलेली असेल का?
- आता आपला देश सामूहिक संसर्गाच्या (कम्युनिटी ट्रान्समिशन) उंबरठ्यावर आहे. एखादा माणूस परदेशात जाऊन आलेला नसेल, अशा कोणाच्या संपर्कात आलेला नसेल, तरीही त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, असे रुग्ण आपल्याकडे आहेत. हा संसर्ग थांबवायचा असेल तर चाचणी करण्याचे निकष सरकारला अधिक व्यापक करावे लागतील व चाचण्यांचे प्रमाण वाढवावे लागेल. इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत व त्यातूनच रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे चाचण्या वाढवून रुग्ण शोधून काढणे आणि त्यांचे विलगीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. असे केल्यास आणि सर्वांनी शारीरिक अंतर राखल्यास पुढील सहा महिने-वर्षभरामध्ये ही साथ रोखण्यात यश येईल. पुढील वर्षी लस आपल्या हातात आली, की कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आणखी एक अस्त्र आपल्याला मिळेल. दहा वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला तेव्हा तो धडकी भरवणारा आजार होता. हळूहळू आपल्याला त्यावर मात करता आली. त्याचप्रमाणे येत्या काही काळात आपल्याला कोरोनावर विजय मिळवता येईल. त्यामुळे १४ एप्रिलला सगळी लढाई जिंकलेली असेल, असा समज करून घेणे योग्य नाही.
 

विषाणूचा किंवा त्याच्या इनक्युबेशन पिरियडचा लॉकडाऊनशी काय संबंध आहे?
- लॉकडाऊनचा परिणाम लगेच दिसत नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आठ दिवस रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. कारण, हे सगळे जुने रुग्ण आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या आधीच लागण झालेली असू शकते. मग, नव्याने लागण झालेले रुग्ण कसे ओळखायचे?  तर, त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. लॉकडाऊन पूर्णपणे पाळला जात असेल, तर ७ एप्रिलनंतर रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसेल. आपल्या देशात लॉकडाऊन पूर्णपणे पाळला जात नाही. स्थलांतरित रुग्ण आपापल्या गावाला निघाले आहेत, गर्दी दिसत आहे. आपण ज्या प्रमाणात लॉकडाऊन पाळू, त्या प्रमाणात रुग्णांची संख्या कमी किंवा जास्त होत आहे, हे दिसून येईल.
 

कोरोना विषाणूचा इनक्युबेशन पिरियड म्हणजे काय?
- एखाद्याच्या शरीरामध्ये विषाणूची लागण झाली व त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसू लागतात, सर्दी, खोकला, ताप असा त्रास सुरू होतो यामधील कालावधी म्हणजे ‘इनक्युबेशन पिरियड’. हा कालावधी सामान्यत: २ ते १४ दिवसांचा असतो. एखाद्याला लागण झाल्यावर दोन दिवसांमध्येच त्रास व्हायला लागतो तर एखाद्यामध्ये तो त्रास १४ दिवसांनी सुरू होतो. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये लागण झाल्यानंतर सरासरी सहा दिवसांनी त्रासाची लक्षणे दिसायला सुरुवात होते.मी एखाद्याशी पाच-सहा दिवसांपूर्वी खूप वेळ गप्पा मारत बसलो किंवा लॉकडाऊनचे नियम पाळले गेले नाहीत किंवा एखाद्याच्या संपर्कात आलो तर मला विषाणूची लागण झाली आहे का, अशी शंका येते. 
अशा परिस्थितीत पाच-सहा दिवसांमध्ये काहीच लक्षणे दिसत नसतील तर त्यानंतर लागण होण्याची शक्यता खूपच कमी असते. परंतु, खात्री करायची असेल, तर ज्या दिवशीपासून लागण झाली अशी शंका असेल त्या दिवसापासून पुढील १४ दिवस मोजावेत आणि तोवर लक्षणे दिसली नाहीत तर लागण झाली नाही, असे समजते.
..........
याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्याच्यापासून इतरांना किती धोका आहे?
- कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यापासून साधारण १४ दिवसांमध्ये आजार बहुतेक वेळा बरा होतो. तीव्र लागण झाली असेल तर हा कालावधी २८ दिवसांपर्यंत वाढतो. १४ दिवस ते २८ दिवस या कालावधीत रुग्णाच्या संपर्कात आल्यास आजार पसरण्याची शक्यता असते. यानंतर त्या रुग्णापासून कोणताही धोका नसतो, हे आपण लक्षत घेतले पाहिजे.

भारतात उन्हाळा सुरू झाला आहे. त्याचा साथ रोखण्यास काही उपयोग होईल का? 
कोरोनाबाबत काही विशेष शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत का?

- उन्हाळ्यामुळे साथ आटोक्यात येईल की नाही, याबाबत अद्याप शास्त्रीय संशोधन झालेले नाही. जास्त तापमानामध्ये विषाणू टिकणे अवघड आहे, असा प्राथमिक अहवाल आहे. परंतु, त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. भारतीयांच्या जनुकांमध्ये अशा काही विशिष्ट गोष्टी सापडल्या आहेत, की ज्यामुळे बहुधा भारतात कोरोनाची तीव्रता कमी होईल, असे सांगणारा एकच निबंध अद्याप समोर आलेला आहे. इतर शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत. ज्या देशांमध्ये लहान मुलांना बीसीजी लस दिली जाते, त्या देशांमध्ये कोरोनाची तीव्रता कमी आहे, असा एक शोधनिबंधही प्रसिद्ध झाला आहे. त्यावरही अधिक अभ्यास सुरू आहे. या तिन्ही बाबी फलद्रूप ठराव्यात, अशी आपण आशा करू या. मात्र, तोपर्यंत आपल्याला गाफील राहून चालणार नाही. प्रतिबंधात्मक पावले उचलावीच लागतील. 

Web Title: The government will have to increase the number of corona tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.