‘एफआरपी’ देण्यासाठी सरकार मदत करणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:22 PM2018-10-24T21:22:08+5:302018-10-24T21:28:05+5:30
राज्यातील सरकार हे शेतकºयांच्या पाठीशी राहणारे आहे; त्यामुळे यंदाही एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना अडचण आली तर राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून मदत करील; परंतु
कोडोली-वारणानगर : राज्यातील सरकार हे शेतकºयांच्या पाठीशी राहणारे आहे; त्यामुळे यंदाही एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना अडचण आली तर राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून मदत करील; परंतु शेतकºयाचा एक रुपयाही एफआरपी थकीत राहू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री येथे दिली.
कोडोली (ता. पन्हाळा) येथे कोडोली हौसिंग सोसायटीच्या मैदानावर रयत क्रांती संघटनेतर्फे झालेल्या ऊस परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत,आमदार सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, शिवाजीराव नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषदेला कोल्हापूरसह सांगली, सातारा व राज्याच्या विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मात्र शेट्टी यांना बेदखल केले. कृषिराज्यमंत्री खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून आगामी लोकसभा निवडणुकीत गुलालाच्या तयारीला लागा असे आवाहन केले. सरकारने शेतकºयांना न्याय दिला नाही तर राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरण्याची घोषणा खोत यांनी केली.
देशातील अनेक राज्यांत ‘एफआरपी’ची रक्कम थकीत असताना महाराष्ट्राने मात्र २१ हजार कोटी रुपये एफआरपी दिली असून, फक्त १२० कोटी रुपयेच थकीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच साखरेला हमीभाव ठरवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. आपण जे करू शकलो नाही ते राज्यातील भाजप सरकार शेतकºयांसाठी करत असल्याने काही लोकांच्या पोटात सारखे दुखत आहे.
आम्ही दुष्काळ जाहीर केल्यावर आता काँग्रेसवाले वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत. त्यांचे सरकार असताना त्यांना कधी दुष्काळ जाहीर करण्याची हिंमत झाली नव्हती; त्यामुळे ते दुष्काळाला टंचाईची परिस्थिती म्हणत होते.’
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सरकार शेतकºयांचे प्रश्न सोडवत असल्याने काहींची दुकाने बंद व्हायची वेळ आली आहे. गेल्या चार वर्षांत ऊसदरासाठी गोळी सोडाच, साधी लाठीही चालली नाही. त्यामुळे काहींचा बॅलन्स गेला असून तोंडावर निवडणुका असल्याने यंदाचे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होणार असून त्याला शेतकºयांनी बळी पडू नये.’
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘रक्ताने माखलेले फोटो, फोड आलेले पाय आणि लाठ्या घेतलेले पोलिसांचे फोटो लावून यंदाही लोकांची दिशाभूल केली जाणार आहे. काही संबंध नसताना माढ्यातून लढलो आणि ४ लाख ८० हजार मते मिळवली. हातकणंगले हा तर माझा घरचा मतदारसंघ आहे. वारणा खोºयातून क्रांतीची सुरुवात करूया.’
परिषदेत आमदार शिवाजीराव नाईक, हाळवणकर, सागर खोत, प्रिया पाटील यांचीही भाषणे झाली. हाळवणकर यांनी शेट्टी यांच्यावर टीकेची झोड उठवली. परिषदेला आमदार अमल महाडिक, नाना महाडिक, पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे विक्रम पाटील, हिंदुराव शेळके, श्रीकांत घाटगे, के. एस. चौगुले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, अरुण इंगवले, अजितसिंह काटकर, मकरंद देशपांडे, सागर खोत, सुनील खोत, ‘रयत’चे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, आदी उपस्थित होते. भाजपचे संघटक अविनाश चरणकर यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा दृष्टिक्षेपात...
१) एफ आरपी देण्यासाठी गरज लागली तर सरकारच्या तिजोरीतून मदत करू.
२) साखर खरेदीचा किमान दर २९०० ऐवजी ३१०० रुपये करावा, अशी शिफारस केंद्राकडे करू.
३) साखर निर्यात केल्यास देशाबाहेर टनास १९०० रुपयांपर्यंत दर आहे. देशांतर्गत बाजारपेठेत तीन हजार रुपये दर आहे. निर्यात झाल्याशिवाय बाजारातील दर वाढणार नाहीत. कमी दर असल्याने बँका साखर देण्यास तयार नाहीत. त्यामुळे टनामागे किमान ११०० रुपयांची तफावत असून त्याची हमी राज्य सरकार घेईल. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार आाणि बँकामध्ये त्रिस्तरीय करार करण्यात येईल.
अपेक्षा आणि वास्तव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद शनिवारी (दि. २७)जयसिंगपूरला आहे. परंतु त्याच्या अगोदरच ऊस परिषद घेऊन यंदाच्या पहिल्या उचलीचा बार उडवून देण्याचा सदाभाऊ खोत यांचा प्रयत्न होता. परंतु या परिषदेत प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मुख्यमंत्र्यांनीही थेट तशी कोणतीच घोषणा केली नाही. जे दिली ती आश्वासने होती. त्यामुळे सदाभाऊ सरकारला शेतकºयांपर्यंत घेऊन येण्यात यशस्वी झाले तरी शेतकºयाला ठोस काही आश्वासन मिळवून देण्यात मात्र त्यांना यश आले नाही.
कोरे अनुपस्थित
ही परिषद कोडोली येथे होती. ती यशस्वी व्हावी यासाठी माजी मंत्री विनय कोरे यांनीही बरेच प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांचे हेलिपॅडवर स्वागत करण्यासाठी कोरे उपस्थित होते; परंतु प्रत्यक्ष ऊस परिषदेला मात्र कोरे उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली.
हुबेहुब..
या परिषदेवर स्वाभिमानीच्या ऊस परिषदेची छाया होती. व्यासपीठासह सर्वत्र ऊस बांधण्यात आले होते. कार्यकर्ते घुमकं वाजवित होते. नेत्यांच्या भाषणावर एक कार्यकर्ता आसूड ओढत होता. व्यासपीठासमोर सदाभाऊंनी मुख्यंत्र्यांना आलिंगन दिल्याचे कटआऊटस लावले होते. परिषदेत सदाभाऊ सदाभाऊ धूमधडाका असा गरज वारंवार केला जात होता.