मराठ्यांना आरक्षण न देणे सरकारला परवडणार नाही, विनायक मेटेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:40 AM2018-11-24T02:40:39+5:302018-11-24T02:40:57+5:30
सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिले नाही तर ते सरकारला परवडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वीच आरक्षण, प्रवर्गाचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागेल.
औरंगाबाद : सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिले नाही तर ते सरकारला परवडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वीच आरक्षण, प्रवर्गाचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागेल. त्यांच्यासमोर पर्याय नाही, असे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
संविधानातील कलम १५:४ व १६:४ हे शैक्षणिक, सामाजिक आरक्षणाबाबत आहे. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण मिळणे स्पष्ट आहे. समाजाला आरक्षण मिळाले नाही तर जानेवारीत पक्ष, संघटनेच्या निर्धार मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असेही मेटे यांनी सांगितले. मागील सरकारपेक्षा या सरकारने मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्याचा पाढाही त्यांनी वाचला.
कोणत्या प्रवर्गातून आरक्षण द्यायचे, याचा निर्णय सरकार घेईल. आम्हाला आरक्षण मिळण्याशी मतलब आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण होऊ नये, याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही आ. मेटे म्हणाले.