सरकार टिकणार, भाजपाशी घटस्फोट नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत
By admin | Published: October 22, 2015 09:02 PM2015-10-22T21:02:54+5:302015-10-22T21:22:17+5:30
चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले. मंदिर वही बनायेंगे, तारिख नाही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
शिवसेना - भाजपामधील वाद शिगेला पोहोचला असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर कधी पडायचे ते आम्ही आमचं बघू असे सांगत तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले. दादरीसारख्या घटनांनी देशाची मान शरमेने खाली जाते अशी खंत व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, गाईवर चर्चा करण्यापेक्षा महागाईवर चर्चा करा. आम्ही सत्तेत असलो तरी महागाईकडे दुर्लक्ष करु शकत नाही. आमची बांधिलकी जनतेशी असून सत्तेशी नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सोनिया गांधींसमोर लाचारी पत्कारणा-या शरद पवारांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असे सडेतोड उत्तरही त्यांनी शरद पवारांना दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावे यासाठी शिवसैनिकांनी गावागावात मोहीम सुरु करावी असे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. विधानसभेवर शिवसेनेचे भगवा फडकवणारच असा निर्धारही व्यक्त केला. कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ़. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणा-यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण त्यांच्या हत्येसाठी हिंदूत्ववादी संघटनांना जबाबदार ठरवले जात आहे. गुन्हेगारांना धर्माची लेबलं कशाला लावता असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मला वाद नकोय, मित्रपक्षाच्या अरेला कारेने उत्तर देऊ नका, जे करायचंय ते आम्ही बघू असे त्यांनी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना सांगितले. भाजपाला मुफ्ती मोहम्मद सईद चालत असतील तर शिवसेनेची थोडं ऐकून घ्या असे आवाहनही त्यांनी भाजपाला केले आहे. रामाने श्रीलंकेत घुसून रावणाला मारले होते, रामाची पुजा करणा-यांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारावे असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे.