सरकार लवकरच कोसळणार
By admin | Published: March 31, 2017 03:57 AM2017-03-31T03:57:30+5:302017-03-31T03:57:30+5:30
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी
नागपूर : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही, असा पावित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुटीबोरी येथे केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा गुरुवारी बुटीबोरी येथे पोहोचली. या वेळी झालेल्या जाहीर सभेत नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल चढविला. गेल्या दोन वर्षात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून ही संघर्ष यात्रा काढली आहे. तुम्ही (शेतकऱ्यांनी) आम्हाला हिंमत द्या, लाठ्या-काठ्या खायला आम्ही तयार आहोत, असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले. तर सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी केली. माजी मंत्री जयंत पाटील, शेकापचे धैर्यशील पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आझमी यांनीही सरकारवर टीका केली.
नव्या समीकरणाचे संकेत
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष, एमआयएम. युनायडेट जनता दल यासारखे विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. हे आगामी महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणाचे संकेत आहेत, असेही खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.
..अन् बस सुरू झाली
संघर्ष यात्रेत सहभागी असलेले सर्व नेते एका बसने प्रवास करीत आहेत. बुटीबोरी येथील जाहीर सभा संपल्यावर नागपूर शहरातील व्हेरायटी चौकात दुसरा कार्यक्रम होता. बुटीबोरीची सभा आटोपून सर्वच बसमध्ये बसले. परंतु बस काही सुरू होत नव्हती. पुढच्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण हे लगेच बसमधून उतरले आणि दुसऱ्या चार चाकी वाहनाने पुढे निघाले. थोड्या वेळाने बसही सुरू झाली आणि सर्व जण पुढे निघाले. (प्रतिनिधी)
भाजपा नेत्यांनी मन की बात बंद करून कर्जमाफीची घोषणा करावी. शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय मिळावा. यासाठीच संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सिंदेवाही ते पनवेल अशी निघालेली संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथे आयोजित जाहीर सभेत विखे पाटील बोलत होते. आता कोणत्याही निवडणुका नसल्याने राजकीय हेतूने ही संघर्ष यात्रा काढलेली नाही. शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी ही संघर्ष यात्रा असल्याचे विखे पाटील म्हणाले.