वारसास्थळे जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील
By Admin | Published: February 27, 2017 05:36 AM2017-02-27T05:36:29+5:302017-02-27T05:36:29+5:30
टाउन हॉल वास्तूची दुरुस्ती व डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर, या वास्तूला नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.
ओंकार करंबेळकर,
मुंबई- प्रसिद्ध एशियाटिक लायब्ररी आणि टाउन हॉल वास्तूची दुरुस्ती व डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर, या वास्तूला नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या टाउन हॉलचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनाच्या वेळेस बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
‘नव्या पिढीसाठी व तरुणांसाठी आपल्या संस्कृतीचे जतन करून, अशी वारसास्थळे जपण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.’
२६ नोव्हेंबर १८०४ रोजी सर जेम्स मॅकिन्टोश यांनी स्थापन केलेल्या लिटररी सोसायटी आॅफ बॉम्बेची पहिली बैठक मुंबईमध्ये झाली. त्यानंतर, १८२३ साली लंडनमध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी आॅफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडची स्थापना करण्यात आली आणि १८३० साली बॉम्बे ब्रँच आॅफ रॉयल एशियाटिक सोसायटी या नावाने मुंबईत शाखा सुरू करण्यात आली. १८७३ साली त्यामध्ये बॉम्बे जिआॅग्राफिकल सोसायटी विलिन झाली, तर १८९६मध्ये अँथ्रॉपॉलिजिकल सोसायटी आॅफ बॉम्बेचाही त्यामध्ये समावेश झाला. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर रॉयल एशियाटिक सोसायटीपासून वेगळे होऊन, संस्थेचे नाव एशियाटिक सोसायटी आॅफ बॉम्बेची निर्मिती करण्यात आली आणि २००२ साली संस्थेला सध्याचे एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबई हे नाव मिळाले.
>महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार
आफ्रिकेचा शोध लावणारा डेव्हिड लिविंगस्टोनचे येथे व्याख्यान झाले आहे. त्याचप्रमाणे, पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिंगही या इमारतीत करण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १८५८ साली कंपनीकडून ब्रिटिश राणीने राज्यकारभार हाती घेतल्याचे स्पष्ट करणारा जाहीरनामा याच पायऱ्यांवर वाचला गेला, तसेच पहिली मॅट्रिक्युलेशन परीक्षा येथेच आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थीही येथे ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या वास्तूचे पूर्ण जतन होणे आपल्या इतिहासासाठी आवश्यक आहे.
- भरत गोठोस्कर, नागरी वारसास्थळांचे अभ्यासक
1833
साली या टाउन हॉलच्या भव्य इमारतीची बांधणी करण्यात आली. या इमारतीचा आराखडा कर्नल थॉमस कोपर यांनी तयार केला होता. इमारतीच्या स्थापत्यशैलीवर ग्रीक आणि रोमन स्थापत्याचा मोठा प्रभाव दिसून येतो. दर्शनी भागामधील भव्य स्तंभच सर्वांच्या नजरेस आकर्षित करून घेतात, तसेच या इमारतीचे बांधकाम इंग्लंडमधून आणलेल्या खास दगडामधून करण्यात आले आहे.
इमारतीच्या आतल्या भागातही जिने, कपाटे, टेबल, खुर्च्यांसाठी लाकडाचा मोठा वापर करण्यात आला आहे. या इमारतीत असणाऱ्या एशियाटिकमध्ये अत्यंत प्राचीन ग्रंथसंपदा असून, पर्शियन, संस्कृत हस्तलिखितेही येथे जपण्यात आलेली आहेत. संस्थेच्या प्राचीन नाण्यांच्या विभागामध्ये ११,८२९ नाणी असून, त्यात कुमारगुप्त प्रथमने सुरू केलेले सोन्याचे नाणेही आहे.
छ. शिवाजी महाराज, अकबर यांच्या काळातील सोन्याच्या मोहोरा व नाणीही येथे सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. डान्टेच्या डिव्हाइन कॉमेडी, जैन तीर्थंकर वासूपुज्य यांच्या जीवनावरील ग्रंथ ‘वासूपुज्य चरित्र’, ‘फिरदौसीचा शाहनामा’, ‘अरण्यक पर्व’ असे प्राचीन ग्रंथ येथे ठेवण्यात आलेले आहेत.
>२००९ पासून कामाला सुरुवात
टाउन हॉलच्या इमारतीचा जीर्णोद्धार व दुरुस्ती २००९ पासून सुरू करण्यात आली होती. या महिन्यामध्ये सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करून, ती नव्याने मुंबईकरांसाठी सज्ज झाली आहे.
>आतापर्यंत आपण चित्रपटात केवळ टाउन हॉलच्या पायऱ्यांपर्यंत चित्रीकरण झालेले पाहिले आहे, पण आता नूतनीकरणानंतर आतील भागही इतका सुंदर झाला आहे की, आतही चित्रीकरण करता येईल. - मुख्यमंत्री