शिवसेनेशिवाय सरकार!
By admin | Published: October 21, 2014 04:23 AM2014-10-21T04:23:03+5:302014-10-21T04:23:03+5:30
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.
नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. काही ‘उद्योगी’ मध्यस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. सरकार स्थापण्यास त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. मित्रपक्ष रासपकडे १ आमदार आहे. मनसे १, बहुजन विकास आघाडी ३, अपक्ष ७, भारिप-बहुजन महासंघ १ आणि शेकपाचे ३ अशा १५ जणांशी भाजपाने संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येते. सत्तास्थापनेस आम्ही कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे सूचक विधान भाजपाचे प्रभारी खा. ओमप्रकाश माथूर यांनी केले.
नवे सरकार स्थापण्याबाबत पक्षाध्यक्ष शहा यांनी गडकरींसोबत विस्तृत चर्चा केली. गडकरींना मुंबईला पाठवावे असे भाजपश्रेष्ठींना वाटते, मात्र अद्याप गडकरींनी होकार दिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक निकाल येताच भाजपाला बिनशर्त समर्थन देण्याची घोषणा केली. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गंमत म्हणजे भाजपाचा कोणताही नेता राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याची बाब बोलायला तयार नाही. गडकरी आणि प्रफुल्ल पटेल यांचा कायम संपर्क सुरू असल्याची माहितीही ‘लोकमत’ला मिळाली आहे. राजनाथसिंग आणि जे. पी. नड्डा यांनी सोमवारी आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी मुंबईला जाण्याचे ठरविले होते. त्यांनी दौरा मंगळवारवर ढकलला. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय भाजपानेच घ्यावा, असे सांगत रा. स्व. संघानेही एकप्रकारे या नव्या राजकीय आघाडीला हिरवा कंदील दिला.