सरकारने शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचे काम केले

By admin | Published: June 1, 2017 01:37 AM2017-06-01T01:37:20+5:302017-06-01T01:37:20+5:30

सद्य:स्थितीत कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला असूनही झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही

The government worked to break the particles of farmers | सरकारने शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचे काम केले

सरकारने शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचे काम केले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वासुंदे : सद्य:स्थितीत कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला असूनही झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही जाग येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडण्याचं काम सध्याच्या सरकारने केले असल्याचा आरोप बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. ३०) दौंड तालुक्याच्या जिरायत भागाच्या दुष्काळी दौऱ्यावेळी बोलताना व्यक्त केले.
त्यांनी तालुक्यातील जिरेगाव, कौठडी, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी या जिरायत पट्ट्यातील गावातील नागरिकांशी थेट संवाद साधून अडी-अडचणी समजावून घेतल्या. एकीकडे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच उपलब्ध पाण्यावर शेतामध्ये उत्पादित केलेल्या कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नसल्याने प्रपंच चालवायचा कसा? मुला-मुलींचे शिक्षण व लग्न करण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
त्याचबरोबर या भागासाठी जनाई उपसा सिंचन योजनेतून वर्षभरात किमान दोन वेळा पाणी सोडण्यात यावे, तसेच या योजनेची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत, ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे अशा ठिकाणी टँकर उपलब्ध व्हावा, ओढा खोलीकरण व बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, तसेच गावातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा व इतर अनेक मागण्या केल्या.
या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, सभापती मीनाताई धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, अप्पासाहेब पवार, गणेश कदम, नितीन दोरगे, लक्ष्मण सातपुते, सारिका पानसरे, उत्तम आटोळे, रामभाऊ चौधरी, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, वासुंदेच्या सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप, हिंगणीगाडा गावच्या सरपंच अलका कदम, उपसरपंच रमेश खराडे, रोटीचे उपसरपंच विलास शितोळे आदी उपस्थित होते.

सुळे यांनी लवकरात लवकर या मागण्या सोडविण्याचे आश्वासन देत, चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग येऊ दे, असा आशावाद व्यक्त केला.

Web Title: The government worked to break the particles of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.