५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:20 PM2017-10-03T20:20:53+5:302017-10-03T20:21:13+5:30
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले.
मुंबई - मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले.
परतीच्या पावसाचा हा काळ आहे. वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पिकावर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतमालाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. मुंबईसह कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याचेही फुंडकर यांनी सांगितले.
याकाळात वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वत: चा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली तसेच विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ वीज कोसळण्याच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे पावसाच्या काळात असा ठिकाणी थांबू नये. कृषीविभागाकडून शेतक-यांना एसएमएसद्वारे अतिवृष्टीबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच पालकमंत्र्यांनाही आपापल्या जिल्ह्यात याबाबत आवाहन करण्यास सांगण्यात आल्याचेही फुंडकर यांनी स्पष्ट केले.