जीएसटीच्या आडून सरकारवर टीकास्त्र

By admin | Published: May 22, 2017 12:43 AM2017-05-22T00:43:19+5:302017-05-22T00:43:19+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी

The government's criticism of GST | जीएसटीच्या आडून सरकारवर टीकास्त्र

जीएसटीच्या आडून सरकारवर टीकास्त्र

Next

अतुल कुलकर्णी  
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी तडाखेबाज भाषणातून केले. राज्य सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभाराची चिरफाड करत त्यांनी जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनाचा राजकीय फायदा उठवला. भाजपामधील काही अस्वस्थ सदस्यांनी पाटील यांच्या भाषणाला जोरदार दाद दिली, तर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी जोरदार भाषण होत असल्याचे इशारे विरोधी बाकावरील सदस्यांना केल्याने तर सत्ताधारी सदस्य त्रस्त झाले.
जयंत पाटील यांनी तब्बल ३ तास भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते परवा भाजपात आलेल्या रामकृष्ण बोर्डीकर यांच्यासह अनेकांना फटके लगावले. जयंतरावांना भाषणासाठी ‘ओपनिंग’ला पाठविणे, ही विरोधकांची रणनिती होती. ‘जीएसटी’साठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाची संधी साधून सरकारवर हल्लाबोल
करायचा, असा डावपेच आखून ही फटकेबाजी केली गेली.
विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सोमवारी सरकारवर तुटून पडणार आहेत. एका दिवशी, एकाच नेत्याने सरकारवर हल्ला चढवायचा, असे ठरवून विरोधक अधिवेशनात या उतरले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वक्तृत्व गुण नसलेल्या विधानसभेतील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध करत सरकारच्या विरोधात बोलण्याची चालून आलेली संधी सोडायची नाही. असे सांगत तो प्रस्ताव बाजूला ठेवला.
मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते दिल्यानंतरही त्यांनी ते कसे स्वीकारले, मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रामुळे राज्यात एकही मोठा प्रकल्प सुरु झालेला नाही. मुख्यमंत्री गाळ काढण्याचे कामे पाहात फिरत आहेत. ज्या बोर्डीकर यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले होते, त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला? अशा एक ना अनेक विषयावरून पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

हे तर खर्चमंत्री!
केंद्राने नियोजन आयोग संपवला व नीती आयोग आणला. राज्याने प्लॅन, नॉनप्लॅन असे दोन्ही बजेट एकच करुन टाकले व नियोजन विभाग संपवला. त्यामुळे अर्थ व नियोजन असे मंत्रीपद सांभाळणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडचे नियोजन खाते संपुष्टात आले. आता जीएसटीमुळे कर लावण्याचे अधिकारही संपल्यामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्यातही काही अर्थ उरला नाही. त्यामुळे आता ते फक्त खर्च करणारे ‘खर्चमंत्री’ राहिलेत! जयंत पाटलांच्या या कोपरखळीला सत्ताधारी बाकावरूनही दाद मिळाली.

श्रेय मनमोहन सिंग यांचेच
जीएसटी, कर्जमाफी, आधार कार्ड, स्मार्ट सीटी, लाभार्थ्यांना थेट लाभ देणे, इस्त्रोमध्ये गुंतवणूक अशा सगळ्या योजना तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच काळातील. मोदी सरकार फक्त श्रेय घेण्याचे काम करत आहे, असे सांगत पाटील यांनी कोण-कोणत्या योजना मनमोहनसिंग यांच्या काळात झाल्या त्याची यादीच वाचून दाखवली.

Web Title: The government's criticism of GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.