सणासुदीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणे सरकारचे कर्तव्यच - आ. डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:55 PM2017-09-26T20:55:52+5:302017-09-26T20:56:29+5:30
तुम्ही सत्तेत असताना काय करता? असे लोक सेनेला विचारतात तेव्हा मला ठणकावून सांगावेसे वाटते की, शिवसेनेचे मंत्री व राज्यसभा व लोकसभेतील खासदार यांनी सरकारकडे सातत्याने महागाईच्या प्रश्नावर पाठपुरावा केला आहे.
पुणे - तुम्ही सत्तेत असताना काय करता? असे लोक सेनेला विचारतात तेव्हा मला ठणकावून सांगावेसे वाटते की, शिवसेनेचे मंत्री व राज्यसभा व लोकसभेतील खासदार यांनी सरकारकडे सातत्याने महागाईच्या प्रश्नावर पाठपुरावा केला आहे. मी स्वतः देखील मुख्यमंत्री व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे सणासुदीच्या काळात तूरडाळ, रवा, मैदा, साखर, तेल, गूळ आदी वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. खरे तर सरकारचे हे कर्तव्यच आहे, पण सरकार एका बाजूला म्हणते, पैसे पुरेसे आहेत पण दुसऱ्या बाजूला मात्र रेशनवर मिळणारी साखर बंद केली जाते. अन्नपूर्णा योजनेच्या महिलांना घरी बसवले आहे. आमचा या मोर्चाचा हेतू महागाई विरोधात आहे.
१९९५ ते ९८ या काळातील सरकारने या पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. एकीकडे शेतमालाला भाव नाहीत आणि दुसरीकडे सामान्य जनता मात्र महागाईच्या रेट्याने हैराण झाली आहे. त्यामुळे आताही ते दर स्थिर असावेत. सध्याची वाढलेली महागाई ही धन दांडग्याच्या हिताचे रक्षण करीत आहे, ही लोकभावना व्यक्त करण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. पुणे शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज पुणे जिल्हा परिषद ते पुणे विधान भवन दरम्यान काढलेल्या भव्य लाटणे मोर्चाच्या वेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, देशात होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनतेला विशेषतः महिलांना कौटुंबिक आर्थिक गणित बसविणे कठीण झाले आहे. नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या दिवशी महागाईच्या भस्मासुराला पूर्णतः गाडून टाकण्याच्या उद्देशाने सर्व महिला जमल्या आहेत. पुणे जिल्हा हा हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवडता जिल्हा आहे. आज पुणेकरांनी हे आंदोलन करून त्यांचा विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे या सर्वाना त्यांचा भरभरून आशीर्वाद असेल. आज सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. यामुळे शहरात एक छान चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे म्हणतील तेव्हा आम्ही सर्वजण सत्ता झुगारून केंव्हाही बाहेर पडायला तयार आहोत. पण ठाकरे साहेबाना याबाबत सल्ला देण्याच्या कोणीही उचापती कोणी करू नये.
आ. डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते या मोर्चाच्या वतीने महागाईबाबत शिवसेनेने केलेल्या मागण्यांचे निवेदन पुण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार व सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, जिल्हा परिषद सदस्य अमोल हरपळे, श्याम देशपांडे, नगरसेविका पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले त्यांच्यासोबत होत्या. यावर येत्या सात दिवसात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन देण्यात आले.
पुणे संपर्कप्रमुख व माजी मंत्री आ. उदय सामंत यांनी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हाकेला ओ दिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन त्यांनी केले. संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव यांनी केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन पाळलेले नाही. सर्वसामान्य महिलांची कुटुंबाचे अंदाजपत्रक सांभाळतांना तारेवरची कसरत होते आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेने लढाई सुरू केली आहे. असे सांगून आज महागाईच्या विरुद्ध शिवसेनेने आयोजित केलेल्या निषेध आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली.
संपर्कप्रमुख माजी मंत्री आ. उदय सामंत व महिला जिल्हा संपर्क संघटक व मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आजच्या मोर्चाच्या नेटक्या संयोजनाबाबत त्यांनी कौतुक केले. या मोर्चात पुणे शहरातील लाटणे घेतलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. महागाईच्या राक्षसाची वेशभूषा केलेल्या कलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुणे शहर व ग्रामीण भागातून शिवसैनिक व शिवसेनेच्या रणरागिणींनी घोषणांनी आज पुणे शहर दणाणून टाकले. यावेळी पुणे शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महागाई विषयावरील पथनाट्य सादर केले.
या मोर्चाला शिवसेना माजी आमदार महादेव बाबर, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत मोकाटे, संपर्कप्रमुख सत्यवान उभे, पुणे शहर अध्यक्ष विनायक निम्हण, बाबा धुमाळ, निर्मला केंडे, राधिका हरिश्चंद्रे, चित्रपट सेनेच्या कीर्ती फाटक, शहर संघटिका सुदर्शना त्रिगुणाईत, महापालिका गटनेते संजय भोसले, माजी उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, माजी गटनेते अशोक हरणावळ, जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, उपजिल्हा प्रमुख रमेश कोंडे, पिंपरी चिंचवड जिल्हा प्रमुख बाबा धुमाळ, कुलदीप कोंडे, महिला आघाडीच्या निर्मला केंडे, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनावडे, अविनाश साळवे, नाना भानगिरे, नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट,महिला आघाडी पदाधिकारी स्वाती ढमाले, रेखा कोंडे,अनिता परदेशी, गीता वर्मा, अमृत पठारे, सविता बलकवडे, छाया भोसले, पद्मा सोरटे व शहर आणि जिल्ह्यातून आलेले शेकडो शिवसैनिक आणि महिला रणरागिणी उपस्थित होत्या.