पणन चळवळ मोडीत काढण्याचे सरकारचे प्रयत्न
By admin | Published: July 28, 2016 04:34 AM2016-07-28T04:34:54+5:302016-07-28T04:34:54+5:30
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्याऐवजी एकूण पणन चळवळ मोडीत काढण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला.
- अजित पवार यांनी केला आरोप
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्याऐवजी एकूण पणन चळवळ मोडीत काढण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. या समितीवर बाहेरुन तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यकर्त्यांना घुसविण्याचा प्रयत्न असून तो लोकशाहीला काळीमा फासणारा आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) दुरुस्ती विधेयकांवरील चर्चेवेळी पवार यांना हा आरोप केला. राज्यात चांगल्या चाललेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. खरे तर शेतकरी हितासाठी या समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्यांना चांगल्या पायाभुत सुविधा द्यायला पाहिजेत. जेथे गोदामे, शीतगृहे, लिलावगृहे नाहीत तेथे ती उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. परंतु भाजप लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालक मंडळावर मागच्या दारातून राजकीय सोय म्हणून कार्यकर्त्याना तज्ज्ञ संचालक म्हणून नेमले जात असून हा लोकशाहीला काळीमा आहे, असे पवार म्हणाले. भाजीपाला नियमनमुक्तीवरून राज्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला होता, याची आठवणही करून दिली.
खोत का ढेपाळले?
- शेतकऱ्यांचे आक्रमक नेते असलेले सदाभाऊ खोत मंत्री झाले, त्यांच्याकडे कृषी व पणन खाते आहे. परंतु शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास खोत का ढेपाळले आहेत काही कळेना झालंय असे सांगत पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.
या विषयावरील चर्चा लांबत जाईल तशी तालिका अध्यक्षांनी चर्चा सिमीत स्वरुपात करावी अशी सुचना करुनही चर्चा रात्री उशिरापर्यंत लांबत गेली.